लोकसत्ता वार्ताहर
बारामती : बीड मधील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची ९ डिसेंबर २०२४ रोजी राजकीय हस्तक्षेपातून हत्या करण्यात आली होती. स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना जनता कधीच माफ करणार नाही, सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सहभागी असलेले सर्व आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी आम्ही सरकारकडे केली आहे, असे विचार संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख यांनी बारामती येथील जनअक्रोश मोर्चा प्रसंगी बोलताना व्यक्त केले.
बीड मधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी सर्वधर्मीय आणि मराठा क्रांती मोर्चा यांच्यावतीने निषेध मोर्चा बारामतीत काढण्यात आला होता,सामाजिक न्यायासाठी लढणाऱ्या संतोष देशमुख यांची निर्घुण स्वरूपामध्ये हत्या करण्यात आली, या हत्या प्रकरणांमध्ये पोलीस तपासातील यंत्रणेत जे जे कोणी आरोपी व गुन्हेगार असतील अशा सर्वांनाच सह आरोपी करून शासनाने जलद गती न्यायालयामध्ये हा खटला चालवावा, आणि आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, अश्या मागणीचे लेखी निवेदन स्वर्गीय संतोष देशमुख कुटुंबीयांच्या वतीने बारामतीचे प्रांताधिकारी श्री. वैभव नावडकर यांना सादर करण्यात आले. दरम्यान वैभवी देशमुख यांच्या भाषणा प्रसंगी सभेला उपस्थित अनेक महिला नागरिकाच्या डोळ्यातून अश्रू आले.
बारामतीच्या कसबा येथील शिवाजी उद्यान येथून हा मोर्चा आज सकाळी दहाच्या दरम्यान श्री. छत्रपती शिवाजी पुतळा पासून काढण्यात आला, या मोर्चा प्रसंगी सर्वधर्मीय, सर्व राजकीय नागरिक व मराठा क्रांती संघटनेचे पदाधिकारी सहभागी झाले होते, बारामती शहरातील प्रमुख बाजारपेठे मधील रस्त्यावरून हा निषेध मोर्चा भिगवन चौकातील हुतात्मा स्तंभापर्यंत आल्यावर या मोर्चाचे जाहीर सभेत रूपांतर झाले.
या मोर्चामध्ये संतोष देशमुख यांच्या कुटुंबातील सदस्य सहभागी झाले होते, स्वर्गीय संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यावेळी बोलताना म्हणाले,” एका निष्पाप माणसाला असे का मारले ? असा प्रश्न उपस्थित करून ते म्हणाले, यासाठी आता आपण न्याय मागायला पाहिजे ना ? या घटनेतील आरोपी वाल्मिकी कराड आणि इतर आरोपींना राजकीय मदत मिळत होती, आरोपींना राजकीय पाठबळ मिळाल्यामुळे ही मोठी घटना घडल्याचे देशमुख यांनी नमूद केले. मागील तीन महिने आम्ही मस्साजोगचे देशमुख कुटुंबीय अन्याय सहन करत असून स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्येसाठी आम्ही न्याय मागत आहोत, राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी देशमुख कुटुंबीयांना न्याय मिळवून द्यावा, यासाठी आता मागणी करत असून याकरिताच आता आम्ही जनतेच्या दरबारात आलो आहोत,असे ही धनंजय देशमुख आपल्या भाषणात बोलताना म्हणाले,
धनंजय मुंडे यांनी मंत्री पदाचा राजीनामा दिला आहे, त्यांच्यावरही आरोप होत आहेत, याबाबत माध्यमांशी बोलताना धनंजय देशमुख म्हणाले, ज्यांच्यावर आरोप केले आहेत, जर ते आरोप सिद्ध होत असतील तर त्यांनाही सह आरोपी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी आम्ही मागणी शासनाकडे केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार ) पक्षाचे युवा नेते युगेंद्र पवार हे सुद्धा याप्रसंगी उपस्थित होते, संतोष देशमुख हत्या प्रकरणात जे कोणी आरोपी असतील त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी यावेळी प्रसार माध्यमाच्या समोर बोलताना व्यक्त केली.
आजच्या निषेध मोर्चा प्रसंगी बारामती शहरातील बाजारपेठे मधील दुकाने कडकडीत बंद ठेवण्यात आली होती, बारामती मधील जन आक्रोश मोर्चा कालावधीत व्यापारी महासंघाने पाठिंबा दिल्यामुळे सर्वं व्यापारी बांधवांनी आप आपली दुकाने बंद ठेवून सहकार्य केले. बारामती शहरातील या मोर्चा दरम्यान चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता, या मोर्चामध्ये हजारोच्या संख्येने महिला, नागरिक,लहान मुले, व विविध पक्षांचे पदाधिकारी सहभागी झाले होते.