वैकुंठ स्मशानभूमीतील प्रलंबित कामे १५ मार्चपूर्वी पूर्ण करण्यात येणार असून अन्य समस्यांचेही कायमस्वरूपी निराकरण करू, असे आश्वासन महापालिका प्रशासनातर्फे मंगळवारी देण्यात आले. एवढेच नव्हे तर, जेसीबी लावून तोडून टाकण्यात आलेला झाडाभोवतीचा पार तातडीने दुरुस्त करण्याची कार्यवाही तातडीने हाती घेण्यात आली.
‘सुशोभीकरणाच्या नावाखाली ‘वैकुंठ’चे स्मशान’ या बातमीद्वारे ‘लोकसत्ता’ने वैकुंठ स्मशानभूमीतील विविध प्रश्नांना वाचा फोडली होती. त्यानंतर महापालिका प्रशासन जागे झाले. महापालिका भवन विभागाचे अधीक्षक अभियंता राजेंद्र राऊत, कार्यकारी अभियंता संदीप खांडवे, कनिष्ठ अभियंता हांडे यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे सरचिचणीस संदीप खर्डेकर यांनी मंगळवारी वैकुंठ स्मशानभूमी येथे भेट देऊन तेथील समस्यांची पाहणी केली.
वैकुंठातील सर्व अंतर्गत रस्त्यांचे काँक्रिटीकरण, विद्युतदाहिनीसमोरील झाडांचे पार आणि नागरिकांच्या विसाव्याचे ओटे यांची डागडुजी, विद्युतदाहिनीमधील अस्थी गोळा करण्याच्या ठिकाणी कुंपण घालून तेथील शेडचे गळके पत्रे बदलणे या कामाला प्राधान्य देणार असल्याचे राऊत यांनी सांगितले. पुढील अर्थसंकल्पीय तरतुदीतून आणखी दोन विद्युतदाहिन्यांची उभारणी, ज्या मोकळ्या जागेत (ओपन शेड) मान्यवर व्यक्तींचे दहन केले जाते, ती संपूर्ण जागा दुरुस्त करून तेथे नागरिकांना बसण्यासाठी तयार करण्यात आलेली अर्धवट बांधकामे पूर्ण करणे ही कामे करण्यात येणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.
स्मशानभूमीच्या मागील बाजूस दोन जुनी बांधकामे असून त्यांचा प्रेमी युगुल आणि मद्यपींकडून गैरवापर होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे ही बांधकामे त्वरित पाडून टाकावीत, असेही निश्चित करण्यात आले. स्मशानभूमीच्या मागील बाजूस नदीत राख टाकली जाते. यामुळे नदीचे प्रदूषण होत असून ते त्वरित थांबवावे आणि त्या संदर्भात कायमस्वरूपी पर्याय शोधावा, अशी मागणी संदीप खर्डेकर यांनी केली. मात्र, हे काम भवन विभागाच्या अखत्यारित येत नसल्याने याबाबत आयुक्तांकडे पाठपुरावा करण्याची सूचना राऊत यांनी खर्डेकर यांना केली.
वैकुंठ स्मशानभूमीतील प्रलंबित कामे १५ मार्चपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासन
‘सुशोभीकरणाच्या नावाखाली ‘वैकुंठ’चे स्मशान’ या बातमीद्वारे ‘लोकसत्ता’ने वैकुंठ स्मशानभूमीतील विविध प्रश्नांना वाचा फोडली होती. त्यानंतर महापालिका प्रशासन जागे झाले.
First published on: 04-02-2015 at 03:25 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vaikunth cemetery renovation problem pune