पुणे प्राथमिक फेरीचा निकाल जाहीर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे : आत्मविश्वासाने मंचावर ठेवलेले पाऊल.. विषयाचा प्रत्येक पैलू उलगडण्याचा केलेला प्रयत्न.. उदयोन्मुख वक्त्यांच्या प्रभावी मांडणीला मिळालेली दाद.. अशा वातावरणात ‘लोकसत्ता वक्ता दशसहस्रेषु’ या स्पर्धेची पुणे केंद्रावरील प्राथमिक फेरी गुरुवारी रंगली. अंतिम फेरीसाठी दहा स्पर्धकांची निवड करण्यात आली.

स्पर्धेची प्राथमिक फेरी गरवारे वाणिज्य महाविद्यालयात झाली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आनंद लेले यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. परीक्षक डॉ. माधवी वैद्य, डॉ. प्रकाश पवार आणि ‘लोकसत्ता’चे सहायक संपादक मुकुंद संगोराम यावेळी उपस्थित होते. प्रास्ताविकात संगोराम यांनी स्पर्धा आयोजनामागील भूमिका सांगितली.

‘मी-टूपणाची बोळवण’, ‘चरित्रपटांचे चारित्र्य’, ‘खेळ की नायक’, ‘क्लोनिंग : माकडानंतर माणूस’ हे विषय स्पर्धेसाठी देण्यात आले होते. स्पर्धकांनी या विषयांची वेगवेगळ्या पद्धतीने मांडणी केली. प्राथमिक फेरीतून निवडलेल्या दहा स्पर्धकांची अंतिम फेरी १३ मार्च रोजी होणार आहे.

‘प्रत्येकाला बोलता येत असले, तरी वक्तृत्व सर्वाकडे नसते. त्यासाठी वाचन आणि अभ्यास करावा लागतो. पूर्वी भाषणे, व्याख्याने ऐकण्यासाठी गर्दी व्हायची, कारण अमोघ वक्तृत्व असलेले वक्ते होते. आज काही अपवाद वगळता तसे वक्ते नाहीत. चांगले वक्ते निर्माण होण्यासाठी ही स्पर्धा महत्त्वाची आहे. चांगल्या वक्तृत्वाचा फायदा व्यक्तिमत्त्व विकासासाठीही होतो. त्या दृष्टीनेही वक्तृत्व कौशल्य विकसित करणे महत्त्वाचे आहे,’ असे प्राचार्य डॉ. आनंद लेले यांनी सांगितले.

अंतिम फेरीसाठी निवड झालेले स्पर्धक

* स्नेहल पिपाडा (पेमराज सारडा महाविद्यालय)

* निखिल बेलोटे (आबासाहेब गरवारे महाविद्यालय)

* अश्विनी तावरे (आबासाहेब गरवारे महाविद्यालय)

* शरयू बनकर (शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय)

* यशवंत खाडे (स. प. महाविद्यालय)

* केतकी कुलकर्णी (विश्वकर्मा इन्स्टिटय़ूट ऑफ इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी)

* तृप्ती पाटील (सिंहगड दंतवैद्यक महाविद्यालय)

* रितेश वाघ (सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय)

* वैष्णवी कारंजकर (संज्ञापन वृत्तविद्या विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ)

* जयंतकुमार काटकर (इंदिरा मुक्त विद्यापीठ)

 

एखाद्या वृत्तपत्राने वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्याचे हे विरळा उदाहरण आहे. त्यासाठी ‘लोकसत्ता’चे मनापासून अभिनंदन. अन्य वक्तृत्व स्पर्धा आणि ‘वक्ता दशसहस्र्ोषु’स्पर्धा यात फरक आहे. स्पर्धेसाठी दिलेले चारही विषय खूपच वेगळे होते. विषयांसाठी विद्यार्थ्यांनी केलेला विचार, मांडलेली मते महत्त्वाची आहेत. त्यामुळेच स्पर्धा उत्तम झाली.

– डॉ. प्रकाश पवार, परीक्षक

वक्ता दशसहस्रेषु’ या स्पर्धेच्या निमित्ताने बऱ्याच वर्षांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधण्याची संधी मिळाली. ‘लोकसत्ता’ने ही स्पर्धा घेणे मला महत्त्वाचे वाटते. ‘लोकसत्ता’च्या अग्रलेखांतून विविध विषयांवर नेहमीच वैचारिक मांडणी केली जाते. त्यामुळेच स्पर्धेसाठीचे विषय विचारपूर्वक निवडलेले होते आणि म्हणूनच ते आव्हानात्मकही होते. स्पर्धकांनी अत्यंत उत्साहाने या विषयांची मांडणी केली. मात्र, विषय जसा दिसतो, त्या पलीकडेही जाऊन विचार करायला हवा.

– डॉ. माधवी वैद्य, परीक्षक

‘पीतांबरी कंठवटी’ प्रस्तुत ‘लोकसत्ता वक्तृत्व स्पर्धे’चे असोसिएट पार्टनर श्री धूतपापेश्वर व पुनित बालन एंटरटेनमेंट प्रा. लिमिटेड आहेत. या स्पर्धेचे पावर्ड बाय पार्टनर वास्तु रविराज, आयटीएम ग्रुप ऑफ इन्टिटय़ूशन्स, इंडियन ऑईल कॉपरेरेशन लिमिटेड आणि जनसेवा सहकारी बँक आहेत.