प्रेमाचा दिवस अर्थात ‘व्हॅलेंटाइन डे’ साजरा करणाऱ्यांमध्ये तरुण मंडळीच अधिक असतात, पण म्हणून वृद्धांचा व्हॅलेंटाइन डे का नसावा?, असे म्हणत काही महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या संघटनांनी वृद्धांश्रमांतील एकाकी आजी-आजोबांच्या हातात हात घालून व्हॅलेंटाइन डेचा आनंद साजरा करण्याचे ठरवले आहे.
मिटसॉम महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या ‘एन्थुझिया क्लब’ या गटातर्फे १४ तारखेला निवारा वृद्धाश्रमात ‘ग्रँडपॅरेंट्स डे’ साजरा करण्यात येणार आहे. शुक्रवारी संध्याकाळी ४ ते ६ या वेळेत हा कार्यक्रम होणार असून विद्यार्थ्यांपैकी काही जण या वेळी वृद्धांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करतील. अभिनव एज्युकेशन सोसायटीच्या कनिष्ठ महाविद्यालयाच्या एनएसएस तुकडीचे विद्यार्थीही शुक्रवारचा दिवस याच पद्धतीने साजरा करणार आहेत. या विद्यार्थ्यांनी सकाळी साडेदहा वाजता कर्वेनगरमधील मातोश्री वृद्धाश्रमात वृद्धांसाठी विशेष कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ संस्थेच्या सभासदांनी ‘माझा भारत-माझा व्हॅलेंटाइन’ ही संकल्पना मांडून शनिवारवाडा येथे संगीत संध्येचे आयोजन केले आहे. हा कार्यक्रम सर्वासाठी विनामूल्य खुला असून तो मतदानजागृती आणि राष्ट्रभक्ती या दोन उद्दिष्टांना समर्पित करणार असल्याचे संस्थेतर्फे कळवण्यात आले. गायक आणि संस्थेचे प्रकल्प प्रबंधक विक्रम हाजरा या वेळी गायन तसेच मार्गदर्शन करणार आहेत. या वेळी नागरिकांसाठी ‘आनंद सर्वेक्षण’ हा उपक्रमही राबवला जाईल.