प्रेम हे गरिबी, श्रीमंती, रंग, रूप आणि जात पहात नाही. त्यामुळं प्रेम कधी कोणावर जडेल हे सांगता येत नाही. पिंपरी-चिंचवडमध्ये देखील असंच उदाहरण आहे जे समाजाची आणि जातीची बंधन झुगारून ते आज सुखी संसार करत आहेत. यास्मिन सूरज उंबरदंड आणि सूरज सुनील उंबरदंड अशी दोघांची नाव आहेत. यास्मिन ही मुस्लीम असून सूरज हा हिंदू आहे. त्यांच्या प्रेमविवाहाला कुटुंबातील व्यक्तींनी विरोध केला. कालांतराने सुरजच्या कुटुंबाने यास्मिनला स्वीकारले. परंतु, सूरजला आजही यास्मिनच्या कुटुंबाने स्वीकारलेले नाही. यास्मिनसोबत तिचे आई वडील बोलत नाहीत. याबाबत यास्मिनने लोकसत्ता ऑनलाइनशी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यास्मिन आणि सूरज दोघे अत्यंत समजूतदार असून उच्च शिक्षित आहेत. यास्मिन वास्तू विशारद आहे, तर सूरज आयटी क्षेत्रात काम करतो. विशेष म्हणजे यास्मिन आणि सूरज दोघेही एकाच गावातील आहेत. त्यांनी लहानपणापासून एकाच शाळेत शिक्षण घेतले. शालेय जीवनानंतर पुढील शिक्षणासाठी त्यांच्यात अनेकदा दुरावा निर्माण झाला, पण ते पुन्हा कुठल्या ना कुठल्या कारणाने एकत्र येत राहिले. १ ली ते १२ वी शिक्षण हे एकाच शाळेत झालं. ते एकमेकांना केवळ आपल्या शाळेत आहे एवढंच ओळखत होते. 

फेसबुकच्या माध्यमातून भेटीगाठी आणि प्रेमाला अंकुर

पुढील शिक्षणासाठी यास्मिन सोलापूरला गेली, तर सूरज त्याच शहरात पुढील शिक्षण घेत होता. तेव्हाच, सर्व वर्गमित्रांनी फेसबुकच्या माध्यमातून एकत्र ग्रुप बनवला. सूरज आणि वर्गमित्र, मैत्रिणी एकत्र आले. ते सर्व सोलापूरला यास्मिनकडे जायचे आणि सर्वजण फिरायला जात. तेव्हा प्रेमाच्या पहिल्या पायरीची नकळत सुरुवात झाली होती. त्यांच्यात पुन्हा काही वर्षे दुरावा निर्माण झाला.

कालांतराने यास्मिन पुण्यात जॉबसाठी आली. तेव्हा सुरुज अगोदरच पुण्यात नोकरीसाठी आलेला होता. दोघांचं शिक्षण पूर्ण झालं होतं. तेव्हा काही महिन्यांनी पुण्यात असलेल्या मित्रांनी तरुण तरुणींनी फेसबुक च्या माध्यमातून पुन्हा ग्रुप तयार केला आणि एकत्र यायचं ठरवलं होतं. यास्मिन आणि सुरजने एकमेकांचा मोबाईल नंबरची देवाणघेवाण केली अन बोलण्यास सुरुवात झाली. त्यांच्या भेटी होत असे, ते एकत्र फिरायला जात असत, असं यास्मिनने सांगितलं.

मैत्रिणींसमोर येऊन प्रेयसीला प्रपोज

एकेदिवशी सुरजने यास्मिनच्या मैत्रिणीकडे मला यास्मिन आवडते असं म्हणून प्रेमाची कबुली दिली. तुम्ही तिला सांगा असंही तो म्हणाला. यास्मिनच्या मनात सुरज होता, पण सुरजने स्वतः येऊन मला प्रपोज करावं, अशी तिची इच्छा होती. त्यानुसार सुरजने मित्र मैत्रिणींसमोर येऊन यास्मिनला प्रपोज केले अन आपण सात जन्म सोबत राहू अशी शपथ घेतली.

सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे, प्रेम तर झालं, लग्नही करणार होते. पण, सुरज हिंदू आणि यास्मिन मुस्लीम असल्याने त्यांच्या प्रेमा पुढे मोठा अडथळा होणार होता. ही बाब त्यांच्या लक्षात आली. मात्र दोघेही डगमगले नाहीत. त्याच दरम्यान यास्मिनला तिच्या गावावरून फोन आला. तुला पाहुणे बघायला आले आहेत. तेव्हा यास्मिनने कारण देत लग्नास नकार दिला. परंतु, पुन्हा एकदा पाहुणे बघण्यास आले असून तुला लग्न करावंच लागेल, मुलगा सुशिक्षित आहे असा दबाव आई-वडिलांकडून आला. मात्र, सुरजला लग्न करण्याचं वचन यास्मिनने दिलं होतं. त्यामुळं तिने लग्न करण्यास नकार दिला.

“आम्ही विष घेऊन मरतो”, आई-वडिलांची यास्मिनला धमकी

यास्मिनच्या आई वडिलांनी तिला संशयाच्या पिंजऱ्यात उभं केलं. तिला विचारण्यात आलं की तुला दुसरा कुठला मुलगा आवडतो का? तेव्हा यास्मिनने सुरज हिंदू असल्याने नाही असं उत्तर दिलं. दरम्यान, व्हॅलेंटाईन डेला यास्मिनने सुरजसह व्हॉट्सऍप डीपी ठेवला. तो चुलत भावाला दिसला आणि त्याने यास्मिनच्या आई वडिलांना दाखवला. यास्मिनला तातडीने पुण्यातून घरी बोलावलं. आम्ही विष घेऊन मरतो अशी धमकी आई वडिलांनी दिली. पण, पुढे मी असं काही करणार नाही म्हणून आई वडिलांना सांगून यास्मिन पुण्यात आली. दुसरीकडे सूरजच्या वडिलांची या प्रेम विवाहला परवानगी दिली होती.

आंतरधर्मीय लग्न करण्यासाठी ऑफिसमधील वरिष्ठ आणि सहकाऱ्यांचीही मदत

यास्मिन आणि सूरजच्या प्रेमाची ऑफिसमध्ये चर्चा झाली. ही बाब यास्मिनच्या सरांपर्यंत गेली. त्यांनी सहकार्य करत सूरजला बोलावून त्याच्याशी गप्पा मारल्या. दोघांना एकत्र समोरासमोर बसवून भविष्यात काय करायचं आहे. यास्मिनला सांभाळू शकतोस का? तुम्हाला खूप अडचणी येतील हे सर्व समजावून सांगितलं. यावरून दोघे निडर असल्याने प्रेमविवाह करायच असं ठरलं. २२ डिसेंबर २०१६ ला यास्मिनच्या सरांच्या मदतीने यास्मिन आणि सूरजने कोर्ट मॅरेज केलं. 

“कोर्ट मॅरेज केल्यानं मुलाला कुटुंबाने घराबाहेर काढलं”

ही बाब यास्मिन आणि सूरजच्या कुटुंबाला माहिती नव्हती. लग्नानंतर यास्मिन हॉस्टेलमध्ये तर सूरज त्याच्या घरी राहायचा. एक महिन्यानंतर सुरजच्या कुटुंबाला त्याने यास्निनसोबत कोर्ट मॅरेज केल्याचं समजलं. त्यांनी रागाने सुरजला घराबाहेर काढलं. इकडे हॉस्टेलमध्ये प्रेमविवाह केल्याने यास्मिनला जास्त दिवस राहता आलं नाही. दोघांनी वेगळं राहायचं ठरवलं. त्यानुसार ते राहिले देखील. ३ महिन्यानंतर यास्मिनने तिच्या आई वडिलांना लग्न केल्याचं सांगितलं. त्यामुळं ते खूप दुखावले गेले.

कुटुंबाकडून दोघांना घटस्फोट घेण्याचा सल्ला

दोन्ही कुटुंब समोरासमोर आले. दोघांनी त्यांना घटस्फोट घेण्यास सांगितला. हा समाज तुम्हाला स्वीकारणार नाही असं सांगण्यात आलं. परंतु ते दोघे त्यांच्या विचारावर ठाम होते. यास्मिनच्या कुटुंबाने तू आमच्यासाठी या जगात नाहीस (मेलीस) असं सांगितलं आणि निघून गेले. हे सर्व झाल्यानंतर एका वर्षानंतर सुरजच्या कुटुंबाने यास्मिनला स्वीकारले. परंतु, यास्मिनच्या कुटुंबाने सुरजला आजही स्वीकारलं नाही. हे दुःख यास्मिनला आहे. दोघांच्या विवाहला पाच वर्षे पूर्ण झाली असून ते सुखी संसार करत आहेत. 

हेही वाचा : पहिल्यांदाच डेटवर जाताय..? मग पहिली भेट शेवटची ठरू नये म्हणून या गोष्टी एकदा वाचाच !

“प्रेमविवाह करायचा असेल, तर आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हा. ज्याच्यावर प्रेम करता त्याच्यासोबतच विवाह करा. अनेक जण म्हणतात की प्रेमविवाह टिकत नाही. पण, असं काही नाही, हे मी ठामपणे सांगते. माझे पती प्रत्येक पाउलावर साथ देतात. प्रेम हे ४ दिवसांचं चांदण नाही हे नक्की. सर्वधर्म समभाव असे म्हणून केवळ जातीला बढावा देऊ नका ते कृतीतून दाखवा,” असं यास्मिन सांगते.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Valentine day special love story of hindu muslim youngster who marry after opposition of family kjp pbs
Show comments