पिंपरी : मावळ लोकसभा मतदारसंघाच्या वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार माधवी जोशी या गुपचूप आल्या आणि उमेदवारी अर्ज भरून निघून गेल्या. कोणतेही शक्तीप्रदर्शन न करता जोशी यांनी बुधवारी (२४ एप्रिल) उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्या उमेदवारीमुळे तिरंगी लढत होईल. माधवी जोशी या रायगड जिल्ह्यातील माणगावच्या आहेत. त्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक होत्या. वर्षभरापासून त्यांची निवडणुकीची तयारी सुरु होती.
जोरदार फलकबाजी केली होती. मात्र, महाविकास आघाडीत मावळची जागा ठाकरे गटाला सुटली. त्यामुळे जोशी यांनी चार दिवसांपूर्वी वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केला. त्यांना तत्काळ उमेदवारी मिळाली. त्यानंतर जोशी यांनी बुधवारी कोणतेही शक्तीप्रदर्शन न करता निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला. महायुतीकडून खासदार श्रीरंग बारणे, महाविकास आघाडीकडून माजी महापौर संजोग वाघेरे आणि वंचितच्या माधवी जोशी यांच्या उमेदवारीमुळे तिरंगी लढत होणार आहे. दरम्यान, कोणते मुद्दे घेऊन निवडणुकीला सामोरे जात असल्याबाबत विचारले असता काहीच नाही म्हणत त्यांनी अधिक भाष्य करण्यास नकार दिला. तसेच बुधवारी अर्ज भरला असून गुरुवारी शक्तिप्रदर्शन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
हेही वाचा >>> भाजप हा एक व्हायरस आहे, आता तो व्हायरस अजितदादांना लागला : आमदार रोहित पवार
जोशी यांच्याकडे साडेचार कोटींची मालमत्ता
माधवी जोशी यांच्याकडे ९३ लाखांची टोयाटो लँड क्रूझर ही मोटार आहे. त्यांच्या विविध बँकांमध्ये ठेवी असून ४५ लाखांचे सोने आहे. त्यांची एक कोटी ५८ लाख ४२ हजार ७६८ रुपयांची जंगम मालमत्ता आहे. तर, आंबीवलीत तीन ठिकाणी शेतजमीन, कर्जतममध्ये एक व्यावासायिक तर, पनवेलमध्ये एक निवासी इमारत आहे. एक कोटी ९७ लाख ७० हजारांची स्थावर मालमत्ता आहे. त्यांची जंगम आणि स्थावर अशी एकूण तीन कोटी ५१ लाख १२ हजार ७६८ रुपयांची मालमत्ता आहे. तर, पती नरेश जोशी यांची ९२ लाख ९६ हजारांची ६८९ रुपयांची जंगम तर एक कोटी १२ लाख ५० हजार स्थावर अशी दोन कोटी पाच लाख ८६ हजार ६८९ रुपयांची मालमत्ता आहे. जोशी कुटुंबियांची एकूण मालमत्ता चार कोटी ५६ लाख ९९ हजार ४५७ रुपयांची आहे. त्यांच्यावर कोणतेही कर्ज नसून उत्पादनाचा स्रोत व्यवसाय दाखविला आहे.