पुणे : शिरूरचे महाआघाडीचे उमेदवार राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या उमेदवारी अर्जावर शुक्रवारी आक्षेप घेण्यात आला. कोल्हे यांनी उमेदवारी अर्जासोबत जोडलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्यावर दाखल गुन्ह्याची माहिती नोंदविलेली नाही. त्यामुळे त्यांचा अर्ज बाद करण्याची मागणी करण्यात आली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मात्र, तक्रार अर्जात उमेदवार अमोल रामसिंग कोल्हे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल असल्याचे नमूद असून त्यासोबत जोडलेल्या नोटीसमध्ये केवळ अमोल कोल्हे नावाचा उल्लेख आहे. त्यामध्ये त्यांचा पत्ता नमूद नाही. परिणामी संबंधित व्यक्ती ही शिरूरचे उमेदवार अमोल कोल्हे हेच आहेत, याचा बोध होत नाही, असे सांगून शिरूरचे निवडणूक निर्णय अधिकारी अजय मोरे यांनी ही तक्रार निकाली काढली आणि कोल्हे यांचा अर्ज वैध ठरविला. या विरोधात वंचितकडून उच्च न्यायालयात दाद मागण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

हेही वाचा – पुणे : गर्दी टाळण्यासाठी रेल्वेचा नवा फंडा! आता प्रवाशांना सीटवरच मोफत पिण्याचं पाणी

हेही वाचा – पुणे लोकसभा : पराभवाच्या भीतीपोटी रविंद्र धंगेकर हे आरोप करीत आहे – भाजप प्रवक्ते संदीप खर्डेकर

शिरूर मतदारसंघातील उमेदवारी अर्जांची छाननी शुक्रवारी करण्यात आली. त्यामध्ये कोल्हे यांच्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी दाखल गुन्ह्याची माहिती दिलेली नाही, असा आक्षेप आम्ही घेतला होता. प्रतिज्ञापत्रात एक स्वाक्षरी नसली, तरी अर्ज बाद करण्यात येतो. मात्र, गुन्ह्याची माहिती दिलेली नसताना कोल्हे यांचा अर्ज बाद करण्यात आला नाही. कोल्हे यांच्याविरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात २०१६ मध्ये फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल आहे. कोल्हे तेव्हा शिवसेनेचे पुणे जिल्हा संपर्क प्रमुख होते. या गुन्ह्यात तत्कालीन खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार विनायक निम्हण आणि महादेव बाबर यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आढळराव पाटील यांनी या गुन्ह्याचा त्यांच्या प्रतिज्ञापत्रात उल्लेख केला आहे, मात्र कोल्हे यांनी उल्लेख केलेला नाही. ही गंभीर स्वरूपाची बाब असूनही त्यांचा अर्ज वैध ठरविण्यात आला. या विरोधात आम्ही उच्च न्यायालयात दाद मागणार आहोत. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार अर्जासोबतच्या प्रतिज्ञापत्राचा नमुना ठरलेला आहे, त्यामध्येही कोल्हे यांनी बदल केले आहेत, अशी माहिती शिरूरचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉ. अफताब अन्वर शेख आणि त्यांचे वकील ॲड. धर्मेंद्र परदेशी यांनी दिली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vanchit will go to court against amol kolhe candidature know the reason pune print news psg 17 ssb