श्रीक्षेत्र जेजुरी येथील ऐतिहासिक खंडोबा गडावर राजमाता अहिल्यादेवी होळकरांचा पुतळा बसवण्याच्या नावाखाली पुरातन दगडी बांधणीच्या चौथऱ्याची तोडफोड करण्यात आली होती. विटा व चुन्यामध्ये भक्कम बांधकाम केलेली एक पाण्याची टाकीही या वेळी तोडण्यात आली होती. या कामाची पाहणी करून काम थांबवण्याचे आदेश पुरातत्त्व खात्याच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी संबंधितांना दिले.
चौथऱ्याच्या तोडफोडीबाबतचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर त्याची गंभीर दखल घेऊन पुरातत्त्व खात्याने श्री मरतड देवसंस्थान समितीला नोटीस बजावली होती. चौथऱ्याची तोडफोड करून तेथे पुतळा व संगमरवरी मेघडंबरी उभारण्याबाबत आपण या कार्यालयास कोणत्याही प्रकारे अवगत केले नाही, असे नमूद करून संबंधित काम तातडीने थांबवण्याचे आदेश देण्यात आले होते.
पुरातत्त्व खात्याचे अधिकारी हरिभाऊ बारगजे यांनी सोमवारी दुपारी जेजुरीत तोडफोड केलेल्या चौथऱ्याची पाहणी केली. त्यानंतर पुढील आदेश येईपर्यंत या ठिकाणी कोणतेही काम करू नये असा आदेश त्यांनी दिला. संबंधित कामासंबंधीचे म्हणणे पुरातत्त्व खात्याकडे बुधवार (२० एप्रिल) पर्यंत मांडावे असेही सांगण्यात आले आहे. प्रत्यक्ष कामासंबंधीचा अहवाल पुणे पुरातत्त्व विभागाचे सहायक संचालक वि. पु. वाहने यांना दिला जाणार असून पुढील आदेश त्यांच्याकडून दिले जाणार आहेत.
शासनाच्या पुरातत्त्व विभागाचे पुणे येथील सहायक संचालक वि. पु. वाहने यांनी ही नोटीस बजावली होती. त्यात म्हटले होते, की खंडोबा मंदिर संकुल परिसर पुरातत्त्व विभागातर्फे राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आले आहे. सन १९६१ चा महाराष्ट्र प्राचीन स्मारके, पुराणवस्तुशास्त्रविषयक स्थळे व अवशेष अधिनियम १९६० मधील कलम २१ मधील पोट कलम एक अनुसार संरक्षित क्षेत्राचा मालक किंवा भोगवटा करणारा इसम धरून कोणत्याही इसमाने राज्य सरकारची परवानगी घेतल्यावाचून संरक्षित क्षेत्राच्या हद्दीत कोणतीही इमारत बांधू नये, असा नियम असतानाही आपण या विभागाची परवानगी न घेता गडावर बांधकाम करीत आहात, आपली ही कृती नियमबाह्य़ आहे. हे काम तत्काळ स्थगित करण्यात यावे व भविष्यात खंडोबा मंदिराशी निगडित जतन व दुरुस्तीची जी कामे करणे आवश्यक आहे, ती कामे या पुरातत्त्व विभागाचा ना हरकत दाखला घेऊन त्यांचेच मार्गदर्शनाखाली करावीत.
अहिल्यादेवींचा पुतळा बसवण्यासाठी होळकरांनीच बांधलेल्या भक्कम बांधणीच्या चौथऱ्याची तोडफोड झाल्यानंतर आता विश्वस्तांमधील मतभेद चव्हाटय़ावर येऊ लागले आहेत. हे काम किती रुपयांचे, याचा ठेकेदार कोण, काम सुरू करण्याचे आदेश कोणाच्या नावे देण्यात आले आहेत, असे अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. दरम्यान जेजुरीतील काही नागरिकांनी याबाबत पुरातत्त्व खाते व जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधला असून दोन दिवसांमध्ये पुरातत्त्व खात्याचे अधिकारी जेजुरीत येऊन गडकोट आवारातील तोडफोडीची पाहणी करणार असल्याचे समजते.

Story img Loader