स्वत:मध्ये आणि सभोवतालच्या परिसरात, समाजात चांगले परिवर्तन घडवून आणण्यासाठी पुण्यात महिलादिनी एका वेगळय़ा उपक्रमाला प्रारंभ होत आहे. महिलादिनी ‘चेंजमेकर्स’ या उपक्रमाच्या माध्यमातून पुण्यातील जागरूक महिला आपापल्या भागाचे सर्वागीण परिवर्तन घडवण्यासाठी सिद्ध होतील.
महिलांच्या सर्वागीण उन्नतीसाठी सुरू झालेल्या ‘स्माईल’ संस्थेतर्फे आता ‘चेंजमेकर्स’ हा महिलांसाठीचा एक वेगळा उपक्रम हाती घेण्यात येत आहे. अनेकविध उपक्रमांच्या, योजनांच्या माध्यमातून महिलांनी स्वत:मध्ये बदल घडवावेत आणि हे बदल घडवतानाच त्यांनी त्यांच्या भोवतीच्या समाजातही बदल घडवावेत अशा स्वरूपाचा हा उपक्रम आहे. भानूबाई नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चरचे या उपक्रमात तांत्रिक साहाय्य मिळणार आहे. ‘चेंजमेकर्स’ उपक्रमात भाग घेणाऱ्या महिलांनी आपापल्या भागातील छोटय़ा-मोठय़ा सर्व गोष्टींमध्ये सहभागी होऊन त्यात योगदान द्यावे, अशी कल्पना असून त्यासाठी महिलांना प्रशिक्षितही केले जाणार आहे. ‘स्माईल’ ही संस्था खासदार अॅड. वंदना चव्हाण यांनी सुरू केली असून ‘चेंजमेकर्स’ उपक्रमाच्याही त्या संयोजिका आहेत.
आपापल्या परिसरात वृक्षारोपण, कचराव्यवस्थापन, स्वच्छता, पाणी, परिसर सुशोभीकरण तसेच सामाजिक, विशेषत: महिलांच्या समस्यांचा, प्रश्नांचा अभ्यास, त्या सोडवण्यासाठी योग्य त्या माध्यमातून प्रयत्न, रोजगाराच्या समस्या, महापालिकेशी संबंधित प्रश्न सोडवणे आदी अनेक कामे ‘चेंजमेकर्स’ उपक्रमातील सहभागी महिला करतील. आपापल्या भागातील प्रश्न आपणच समजून घ्यायचे आणि ते योग्य त्या माध्यमातून सोडवायचे हे उपक्रमाचे मुख्य सूत्र राहील आणि उपक्रमातील महिलांनी काही ना काही चांगले बदल आपापल्या भागात घडवावेत ही या उपक्रमाची मुख्य संकल्पना असेल. त्यासाठी निवासी विभागांचे छोटे छोटे गट केले जाणार आहेत. प्रत्येक भागासाठी पाच जणांची एक समिती स्थापन केली जाईल. त्यात किमान तीन महिला असतील आणि अध्यक्षही महिलाच असेल.
सहभागी झालेल्या महिलांनी या उपक्रमांतर्गत आपापल्या भागात काय बदल केले, त्याचे काय परिणाम झाले हे लक्षात यावे यासाठी उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यात सहा महिन्यांनंतर स्पर्धाचेही आयोजन केले जाईल. ‘स्पर्धा कृतिशील नागरिकत्वाची’ असे तिचे स्वरूप असेल. चांगले उपक्रम घडवून आपापल्या भागात बदल घडवून आणणाऱ्या महिलांच्या गटांना पारितोषिकेही दिली जातील. दिल्लीत अशा स्वरूपाचा उपक्रम सुरू झाला असून तेथे त्याला चांगले यश आले आहे. पुण्यातील उपक्रमाचा प्रारंभ महिलादिनी (शनिवार, ८ मार्च) एका कार्यक्रमात होईल.
प्रत्येक गोष्ट महापालिकेने करायची ही मानसिकता आता बदलावी लागेल. ही मानसिकता बदलण्यासाठी ‘चेंजमेकर्स’ हा उपक्रम प्रोत्साहन देणारा ठरेल. बदल घडवायचा असेल, तर महिलांनीही पुढाकार घेतला पाहिजे. त्या निश्चितपणे बदल घडवू शकतात. महिलांचे सबलीकरण आणि सभोवताली परिवर्तन या दोन्ही गोष्टी या उपक्रमातून नक्कीच साध्य होतील.
खासदार वंदना चव्हाण
संयोजिका, चेंजमेकर्स