काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारचे एकापाठोपाठ एक असे विविध घोटाळे बाहेर काढणार असून सिंचन घोटाळ्याची रक्कम सरकारी तिजोरीत जमा करेपर्यंत स्वस्थ बसणार नाही, असा इशारा माजी खासदार किरीट सोमय्या यांनी दिला.
मावळ तालुका भाजप कार्यकर्ता ते नेता प्रशिक्षण कार्यशाळेच्या समारोप कार्यक्रमात सोमय्या बोलत होते. शिवसेना संपर्कप्रमुख श्रीरंग बारणे यांच्या हस्ते कार्यशाळेचे उद्घाटन झाले. आमदार बाळा भेगडे, माजी आमदार दिगंबर भेगडे, रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, शिवसेनेचे भारत ठाकूर, केशवराव वाडेकर, सभापती राजाराम शिंदे, उपसभापती रंजना गराडे, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष रवींद्र भेगडे, संभाजी येवले, महिला आघाडी अध्यक्षा नंदा सातकर, प्रशांत ढोरे या प्रसंगी उपस्थित होते.
सोमय्या म्हणाले, ‘‘आघाडी सरकारने १० लाख ५७ हजार कोटी रुपयांचे घोटाळे केले आहेत. आदर्श घोटाळ्याचा अहवाल हाती आला असून लोकलेखा समितीने त्यासंदर्भात ठपका ठेवला आहे. राजकीय नेत्यांनी या सोसायटीतील सदनिका आपल्या नातेवाइकांना दिल्या आहेत. सीबीआय ही संस्था निरपेक्षपणे तपास करीत नाही. महागाई, भ्रष्टाचार आणि महिलांवरील अत्याचार यामुळे त्रस्त झालेली जनता काँग्रेसला पराभूत करणार असून आगामी निवडणुकीनंतर नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे. देश सुजलाम सुफलाम करणे हेच भाजप कार्यकर्त्यांचे स्वप्न मोदी यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण होणार आहे.’’
संघटनमंत्री अविनाश बवरे यांनी सूत्रसंचालन केले. रामदास गराडे यांनी आभार मानले.

Story img Loader