सिंहगडावर जाणारा घाट रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक झाला आहे. या रस्त्याची आवश्यक ठिकाणी रुंदी वाढविण्यात येणार आहे. तसेच वळण सुधारणा, रस्ते सुरक्षा विषयक कामे करण्यात येणार आहेत, अशी माहिती राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधिमंडळात दिली.
हेही वाचा- पुणे जिल्ह्यातील अंगणवाड्या वीजजोडणी अभावी अंधारात
आमदार भीमराव तापकीर यांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना वनमंत्री मुनगंटीवार यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, की सिंहगडावर पर्यटनासाठी जाणारा घाट रस्ता वाहतुकीसाठी धोकायदायक झाल्याची बाब अंशत: खरी आहे. हा रस्ता ग्रामीण मार्ग दर्जाचा असून त्याची लांबी २.९० किलोमीटर आहे. हा रस्ता वनविभागाच्या हद्दीत असून जिल्हा परिषदेच्या अखत्यारित आहे. या रस्त्याची आवश्यक ठिकाणी रुंदी वाढविण्यात येणार आहे. तसेच वळण सुधारणा करणे, रस्ते सुरक्षा विषयक बाबी करणे आणि इतर आनुषंगिक कामे करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने अंदाजपत्रक सादर केले आहे. हे अंदाजपत्रक वन विभागामार्फत जिल्हा परिषदेकडे मान्यतेसाठी सादर करण्यात आले आहे. अंदाजपत्रकाला मान्यता आणि निधी प्राप्त झाल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्त्याचे काम पूर्ण करण्यात येईल.