करोनाच्या पार्श्वभूमीवर दुय्यम निबंधक कार्यालयांतील गर्दी टाळण्यासाठी आणि राज्य सरकारने मुद्रांक शुल्कात दिलेल्या दोन टक्के सवलतीचा फायदा नागरिकांना होण्यासाठी अधिकाधिक दस्त नोंदणी ऑनलाइन होण्यासाठी नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यानुसार खात्यांतर्गत एका खास शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच दस्त नोंदणीची प्रक्रिया अधिक जलद होण्यासाठी दस्त नोंदणीचे दुवे अधिक कालावधीसाठी खुले ठेवणे, स्कॅ निंग वाढवणे अशा विविध उपाययोजना करण्यात येत आहेत.
राज्य सरकारने मुद्रांक शुल्कात सवलत दिली असल्याने राज्यभरातील दुय्यम निबंधक कार्यालयांत मालमत्ता, सदनिका खरेदी-विक्रीच्या व्यवहारांत वाढ झाली आहे. दस्त नोंद करण्यासाठी निबंधक कार्यालयांत नागरिकांची गर्दी होत आहे.
करोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत असून गर्दी टाळण्यासाठी अधिकाधिक ऑनलाइन दस्त नोंदणी होण्यासाठी नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाचे प्रयत्न सुरू आहेत.
याबाबत बोलताना राज्याचे नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक श्रावण हर्डीकर म्हणाले, ‘दस्त नोंदणी अधिकाधिक ऑनलाइन होण्यासाठी खात्यांतर्गत अधिकाऱ्यांचे खास शिबिर घेण्यात येणार आहे. तसेच दस्त नोंदणीचे दुवे अधिक कालावधीसाठी खुले ठेवणे, नोंद झालेल्या दस्तांचे स्कॅ निंग तातडीने होण्यासाठी ही प्रक्रिया वाढवणे याबाबत कार्यवाही करण्यात येत आहे. नोंद झालेल्या दस्तांचे स्कॅ निंग होताना काही त्रुटी असून, या अडचणी दूर करण्यात येत आहेत.’
सुटीच्या दिवशी दस्त नोंदणीचा निर्णय लवकरच
राज्य सरकारने मुद्रांक शुल्कात दिलेली दोन टक्के सवलत ३१ मार्च रोजी संपणार आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर अशा महत्त्वाच्या महानगरांमध्ये मालमत्ता, सदनिका खरेदी-विक्रीचे व्यवहार वाढले आहेत. त्यामुळे या शहरांसह राज्यात ज्या ठिकाणी सवलतीच्या कालावधीत (सप्टेंबर २०२० ते फे ब्रुवारी २०२१) अधिक दस्त नोंद झाले आहेत, त्या ठिकाणची दस्त नोंदणी कार्यालये शासकीय सुटीच्या दिवशीही खुली ठेवण्यात येणार आहेत. याबाबतचा निर्णय चालू आठवडय़ात घेण्यात येणार आहे, असेही नोंदणी महानिरीक्षक हर्डीकर यांनी सांगितले.