मधुमेह दिनानिमित्त गुरुवारपासून शहरात विविध संस्थांतर्फे मधुमेही रुग्णांसाठी विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. इन्शुलिनचा शेध लावणाऱ्या फ्रेडरिक बेंटिंग आणि चार्लस बेस्ट या शास्त्रज्ञांपैकी बेंटिंग यांचा वाढदिवस (१४ नोव्हेंबर) मधुमेह दिन म्हणून पाळला जातो.
‘डायबेटिक केअर रीसर्च फाउंडेशन’तर्फे गुरुवारी सकाळी सारसबाग ते टिळक स्मारक मंदिर अशी बालमधुमेहाविषयी जनजागृती फेरी काढली जाणार आहे. ज्येष्ठ कसोटीपटू चंदू बोर्डे, हॉकीपटू संदीप सिंग, एमक्युअर कंपनीचे अरूण खन्ना आदी या वेळी उपस्थित राहणार आहेत. दहा वाजता टिळक स्मारक मंदिर येथे संस्थेच्या कार्याविषयी माहितीपट दाखवला जाईल. या वेळी अरबाज खान या बालमधुमेही विद्यार्थ्यांला विशेष पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. तसेच ११.३० वाजता मधुमेहाविषयी माहिती देणाऱ्या प्रदर्शनाचे उद्घाटनही करण्यात येईल.
पर्वती येथील मित्रमंडळ चौकातील शहाडे हॉस्पिटलतर्फे गुरुवारी संध्याकाळी पाच वाजता शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी रक्तातील साखर आणि पायांची तपासणी मोफत करण्यात येणार असून आहारविषयक सल्लाही दिला जाईल. तसेच मधुमेह्य़ांसाठी ‘मधुमेह व तुमचे अनुभव’ या विषयावर कथा, निबंध व काव्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून काही मजेशीर खेळ खेळण्याची संधीही रुग्णांना मिळणार आहे. हे कार्यक्रम विनामूल्य असून रुग्णांनी ०२०- २४४२४७८७, २४४२४०३६ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधून नावनोंदणी करावी, असे आवाहन रुग्णालयातर्फे करण्यात आले आहे.
‘डायबेटिक असोसिएशन ऑफ इंडिया’च्या पुणे शाखेला पन्नास वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त १६ व १७ नोव्हेंबरला सकाळी १० ते रात्री ८ या वेळात टिळक स्मारक मंदिराच्या प्रांगणात मधुमेहावरील उपचारांची माहिती देणाऱ्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या दोन्ही दिवशी प्रदर्शनस्थळी असलेल्या मंडपात मधुमेहतज्ज्ञांची व्याख्यानेही होतील. प्रदर्शनास भेट देणाऱ्या पहिल्या शंभर व्यक्तींची रक्तातील साखरेची तपासणी मोफत करण्यात येणार असून त्यानंतर केवळ दहा रुपये शुल्क घेऊन ही तपासणी करून दिली जाणार आहे. रक्ताच्या इतर काही तपासण्याही सवलतीच्या दरात करून घेण्याची संधी रुग्णांना मिळणार आहे. १७ नोव्हेंबरला सकाळी आठ वाजता टिळक स्मारक मंदिरापासून मधुमेह जनजागृती पदयात्रा काढली जाणार असून साडेनऊ वाजता याच ठिकाणी ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांच्या हस्ते संस्थेच्या संकेतस्थळाचे उद्घाटन करण्यात येईल.