पिंपरी : क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले आणि राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी येथील भीमसृष्टी मैदानात महापालिकेच्या वतीने आजपासून (शुक्रवार) १६ एप्रिलपर्यंत विचार प्रबोधन पर्वाचे आयोजन करण्यात आले आहे. या पर्वात महानाट्य, गीतगायन, पोवाडे, कव्वाली, एकपात्री नाट्यप्रयोग, चर्चासत्रे, परिसंवाद, शाहिरी जलसा असे विविध कार्यक्रम होणार आहेत. ‘मी जोतिबाची सावित्री’ या एकपात्री नाट्यप्रयोगाने प्रबोधनपर्वास शुक्रवारी सुरुवात होणार आहे. त्यानंतर विद्रोही शाहिरी जलसा, समाज प्रबोधनात्मक गीतगायन, गुलामांच्या उतरंडी हे नाटक होणार आहे. ‘क्रांतिसूर्य ते महासूर्य – समतेच्या क्रांतिलढ्याचा प्रवास’ या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये अभिनेते मकरंद अनासपुरे, संदीप कुलकर्णी, ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे, विचारवंत मिलिंद टिपणीस आणि साहित्यिक प्रभाकर ओव्हाळ सहभागी होणार आहेत.

राज्यघटनेवर आधारित गीतगायन, गझल, सर्वव्यापी डॉ. बाबासाहेब आंबेडकर या विषयावरील चर्चासत्र शनिवारी (१२ एप्रिल) होणार आहे. या चर्चासत्रामध्ये माजी खासदार, अर्थतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव, ज्येष्ठ साहित्यिक ज. वि. पवार, महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे सदस्य गोरक्ष लोखंडे, छत्रपती संभाजीनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. वाल्मीकी सरवदे, विधिज्ञ ॲड. अंबादास बनसोडे आणि राष्ट्रीय जल अकादमीचे संचालक मिलिंद पानपाटील सहभागी होणार आहेत. त्यानंतर गायक आनंद शिंदे यांचा महामानवांच्या गीतांचा कार्यक्रम होईल.

बुद्ध-भीमगीतांची परिवर्तनवादी मैफल, शाहिरी जलसा हा गीतगायनाचा कार्यक्रम रविवारी (१३ एप्रिल) होणार आहे. बुद्ध-भीमगीतांचा अंतर्भाव असलेली शास्त्रीय गायनाची मैफल – धम्मपहाट, राज्यघटनेवर आधारित ‘भारत की राज्यघटना’ हा गीत गायनाचा कार्यक्रम सोमवारी (१४ एप्रिल) होणार आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पिंपरी येथील पुतळ्यावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. आदिवासी कलानृत्यातून महामानवाला अभिवादन करण्यात येणार आहे. अपंग कलाकारांचा सहभाग असलेला आंतरराष्ट्रीय ख्यातीचा, नृत्य-संगीतमय विश्वातील अविस्मरणीय कलाविष्कार ‘ट्रिब्युट टू डॉ. बाबासाहेब आंबेडकर ऑन व्हील्स’ हा कार्यक्रमही होईल.

स्थानिक कलावंतांचे गीतगायन, ‘मी रमाई बोलते’ हा एकपात्री नाट्यप्रयोग, भीमबुद्ध गीतांची गोड वाणी गीतगायन मंगळवारी (१५ एप्रिल) होईल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन चरित्रावर आणि राज्यघटनानिर्मितीवर आधारित ‘संविधान शिल्पकार’ या महानाट्याचे आयोजन सांगवी येथील पीडब्ल्यूडी मैदान येथे बुधवारी (१६ एप्रिल) करण्यात आले आहे.