ज्ञानोबा-माऊलीचा जयघोष सुरू झाला की, त्यांची वारीत सहभागी होण्याची लगबग सुरू होते. वीस वषार्ंपासून असलेला वारीतील सहभाग अपघातात पाय गमवावा लागल्यानंतरही त्यांनी कायम ठेवला. अपंग असलो तरी वारीत खंड पडणार नाही, मरेपर्यंत वारी चुकवणार नाही, असा ठाम निर्धार ते व्यक्त करतात. जालिंदर माने असे या अपंग वारकऱ्याचे नाव आहे.
मूळचे सोलापूर जिल्ह्य़ातील माळशिरस भागातील रहिवासी असलेले जालिंदर माने गेल्या २० वर्षांपासून संतश्रेष्ठ तुकोबांच्या पालखी सोहळ्यात देहू ते पंढरपूपर्यंत सहभागी होतात. सात वर्षांपूर्वी त्यांना अपघात झाला, त्यामुळे त्यांचे जीवनमान बदलून गेले. उजवा पाय अध्र्यातून कापावा लागल्याने त्यांना आधाराशिवाय चालता येत नाही. मात्र, अशा परिस्थितीतही त्यांनी दरवर्षीच्या वारीत खंड पडू दिला नाही. चाके लावलेली छोटय़ाशा ढकलगाडीच्या आधारे ते वारीत सहभाग होऊ लागले. त्यानुसार, गेल्या सात वर्षांपासून त्यांचा हा नित्यक्रम आहे. विठोबाच्या भेटीची आस मला स्वस्थ बसू देत नाही. पालखीत सहभागी होण्यातच ईश्वरी आनंद प्राप्त होतो, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत.