पुणे : १०० टक्के वसंत मोरे हा निवडणुकीच्या रिंगणात असणार असून ‘मी एकला चलो रे’च्या भूमिकेवर ठाम आहे, असे विधान वसंत मोरे यांनी केले. मनसे पक्ष सोडल्यानंतर वसंत मोरे हे चर्चेत आहेत. पुणे लोकसभेची उमेदवारी मिळवण्यासाठी त्यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांची भेट घेतली. मात्र, अपेक्षित प्रतिसाद दिसून आला नाही. या पार्श्वभूमीवर त्यांनी समाजमाध्यमावर प्रसिद्ध केलेली एक पोस्ट सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
महायुतीने पुण्याची उमेदवारी माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना जाहीर केली. त्यांचा प्रचारदेखील सुरू झाला आहे. भाजपच्या नेत्यांकडून पुणे लोकसभेची निवडणूक ही एकतर्फी होणार असल्याची वक्तव्ये समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर मोरे यांनी समाजमाध्यमावर एक पोस्ट शेअर केली आहे. ‘..तरी पण निवडणूक एकतर्फी कशी होते, बघतोच मी…’, असे म्हणत मोरे यांनी भाजप नेत्यांना डिवचले आहे.
हेही वाचा – मावळमध्ये महायुतीच्या उमेदवारीचा तिढा सुटेना
ही पोस्ट तुफान व्हायरल झाली आहे. त्याबाबत वसंत मोरे यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले की, मागील पाच वर्षांच्या काळात भाजपने पुणे शहराचा खेळखंडोबा करून ठेवला आहे. तरीदेखील कोणी म्हणत असेल की, ही निवडणूक एकतर्फी होणार, तर त्या व्यक्तींना एकच सांगू इच्छितो की, जोवर पुणे शहरात वसंत मोरे आहे, तोपर्यंत ही निवडणूक एकतर्फी होऊ देणार नाही. मी कोणत्याही पक्षात जाण्यासाठी मनसे पक्ष सोडला नाही. १०० टक्के वसंत मोरे हा निवडणुकीच्या रिंगणात असणार असून ‘मी एकला चलो रे’च्या भूमिकेवर ठाम आहे.
हेही वाचा – पिंपरी : विनापरवाना रस्ते खोदताय; पोलिसांनी दिला ‘हा’ इशारा
निवडणुकीत आणखी थोडी रंगत येऊ द्या, माझ्या वाटेत कोणी काटे टाकले ते सर्व काटे योग्यवेळी मी बाहेर काढणार. या सर्व बाबी जाहीरपणे व्यासपीठावर पुराव्यासह सांगणार. आता माझी अपक्ष निवडणूक लढविण्याची तयारी आहे. तसेच, एकतर्फी निवडणूक व्हायची असती तर मागील दहा दिवसांत कोणाकोणाचे फोन आले, या गोष्टी योग्यवेळी पुणेकर नागरिकांसमोर आणणार, असे सांगत मोरे यांनी भाजप नेत्यांना सुनावले.