Vasant More गावी निघालेल्या तरुणीवर शिवशाही बसमध्ये बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे बुधवारी सकाळी साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली. पोलिसांनी आरोपीचे नाव निष्पन्न केले असून त्याचा शोध घेण्यास पोलिसांची आठ पथके रवाना झाली आहेत. दत्तात्रय रामदास गाडे असं या प्रकरणातल्या आरोपीचं नाव आहे. या घटनेचे पडसाद पुण्यात उमटायला सुरुवात झाली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते वसंत मोरे यांनी या ठिकाणी पाहणी केली. तसंच स्वारगेट बस स्थानकाच्या आगारात रोज बलात्कार होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

शिवसेनेकडून स्वारगेट आगाराची पाहणी

स्वारगेट बस स्थानकात बसमध्ये घडलेल्या बलात्काराच्या घटनेचा निषेध करत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून केबीनची तोडफोड करण्यात आली. तसंच उभ्या असलेल्या बसेसची पाहणीही वसंत मोरे यांनी केली. वसंत मोरे यांनी यानंतर गंभीर आरोप केला आहे.

काय म्हणाले आहेत वसंत मोरे?

“या लोकांनी चार बसेसचं लॉजिंग केलं आहे. याचा अर्थ असा होतो की याच सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत इथे रोज बलात्कार होतात. मीडियाने सगळ्या गोष्टी जर नीट पाहिल्या तर कळेल बसेस मध्ये कंडोम पडले आहेत. आगाराच्या मागच्या बाजूला या बसेस ठेवल्या आहेत. त्यामुळे या ठिकाणी या लोकांचा हात आहे.” उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते वसंत मोरे हे या ठिकाणी आले त्यांनी या ठिकाणी पाहणी केली. त्यानंतर त्यांनी आगारातील कर्मचाऱ्यांवर, सुरक्षा रक्षकांवर वसंत मोरेंनी गंभीर आरोप केले आहेत.

आगार प्रमुखांचं निलंबन करा, स्वारगेट स्थानकात रोज बलात्कार होत आहेत-वसंत मोरे

आगार प्रमुखांचं निलंबन केलं पाहिजे आणि सुरक्षा रक्षकांवर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी वसंत मोरे यांनी केली. ३७६ क्रमांकाच्या कलमांखाली यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. बलात्कार होत असताना हे सगळे बघ्याच्या भूमिकेत होते का? आम्ही सुरक्षा केबीनची तोडफोड केली आहे. त्या समोर असलेल्या बसमध्ये तरुणीवर बलात्कार झाला आहे. हा विषय संवेदनशील आहे. आगाराच्या मागच्या बाजूला उभ्या असलेल्या बसेस पाहिल्या तर कळेल की इथे रोज बलात्कार होत आहेत. कुणाला तरी इथे आणलं जातं आहे आणि बलात्कार केला जातो आहे. ज्या आरोपीने बलात्कार केला तो पाच दिवसांपासून स्वच्छतागृहाजवळ झोपत होता. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्याला हटकलं का नाही? सुरक्षा कर्मचारी या लोकांना मॅनेज होतात का? पोलीस यंत्रणा हाकेच्या अंतरावर असली तरीही ते पोलीस स्टेशन आगाराच्या बाहेर आहे. मात्र या ठिकाणी २० सुरक्षा कर्मचारी आहेत ते काय झोपा काढतात का? ते अशा प्रकारे काम करत असतील तर त्यांचं निलंबन केलं पाहिजे. शिवशाही या नावाखाली या लोकांनी थेट लॉजिंग तयार केलं आहे. त्या ठिकाणी साड्या पडल्या आहेत, कंडोम, कंडोमची पाकिटं पडली आहेत. अशी माहिती वसंत मोरे यांनी माध्यमांना दिली.

Story img Loader