पुणे : कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष यांच्या हस्ते ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचा सत्कार करण्यात आला. प्रेक्षकांच्या गर्दीमुळे नाट्यगृहात बसण्यासाठी जागा नव्हती. त्यामुळे, मनसेचे माजी शहराध्यक्ष वसंत मोरे यांना नाट्यगृहातील मोकळ्या जागेत भिंतीजवळ उभे रहावे लागले असल्याच्या घटनेची चर्चा झाली असताना वसंत मोरे यांनी ‘मला नीट मांडी घालून बसता येते’ अशा आशयाची पोस्ट केली आहे. त्यांच्या या पोस्टची चर्चाही समाजमाध्यमातून सुरू झाली आहे.
अभिनेते अशोक सराफ यांच्या पन्नास वर्षांच्या प्रदीर्घ कारकीर्दीचा गौरव करण्यासाठी ‘अशोक पर्व’ या कार्यक्रमाचे आयोजन रविवारी करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या समारोप सत्रात अशोक सराफ यांचा सत्कार राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाला उशिरा आल्याने मनसे नेते वसंत मोरे यांना नाट्यगृहाच्या मोकळ्या जागेत उभे रहावे लागले होते. या घटनेची जोरदार चर्चा समाजमाध्यमात झाली होती. त्याचा संदर्भ घेत वसंत मोरे यांनी समाजमाध्यमात नवी पोस्ट केली आहे. ‘मी फक्त उभा रहात नाही, तर जमिनीवर नीट मांडी घालून बसतोही’ अशी पोस्ट त्यांनी छायाचित्रासह केली आहे. राज ठाकरे यांच्या कार्यक्रमात उभे रहावे लागल्यानेच त्यांनी ही सूचक पोस्ट केल्याचे बोलले जात आहे.