वक्तृत्वोत्तेजक सभेतर्फे होणाऱ्या वसंत व्याख्यानमालेच्या ज्ञानसत्रात यंदा असहिष्णुता, दुष्काळ आणि स्मार्ट सिटी या विषयांवर व्याख्याने होणार आहेत. गुरुवारपासून (२१ एप्रिल) सुरू होत असलेल्या १४२ व्या ज्ञानसत्राचा केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांच्या ‘हवामानबदल’ या विषयावरील व्याख्यानाने २० मे रोजी समारोप होणार आहे. टिळक स्मारक मंदिर येथे सायंकाळी साडेसहा वाजता ही व्याख्यानमाला होणार आहे.
‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच’ या लोकमान्यांनी केलेल्या प्रतिज्ञेच्या शताब्दी वर्षांनिमित्त ज्येष्ठ पत्रकार भारतकुमार राऊत यांच्या व्याख्यानाने गुरुवारी ज्ञानसत्राचा प्रारंभ होणार आहे. ‘महाराष्ट्रापुढील दुष्काळाचे आणि पाणीटंचाईचे आव्हान-कठोर निर्णयाची गरज’ या विषयावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे २३ एप्रिल रोजी जयंतराव टिळक स्मृती व्याख्यान होणार आहे. ‘असहिष्णुता आणि आमचा पंथ’ या विषयावर २५ एप्रिल रोजी होणाऱ्या चर्चासत्रात डॉ. सुहास पळशीकर, अभय वर्तक आणि फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचा सहभाग आहे. ‘पुणे-एक स्मार्ट सिटी’ या विषयावर २७ एप्रिल रोजी होणाऱ्या परिसंवादात पालकमंत्री गिरीश बापट, महेश झगडे, कुणाल कुमार, सतीश मगर, किरण मोघे आणि सुकृत खांडेकर यांचा, तर ‘सामान्यांना परवडणारी घरे’ या विषयावर १६ मे रोजी होणाऱ्या चर्चासत्रात डी. एस. कुलकर्णी, सुधीर दरोडे आणि श्रीराम मोने यांचा सहभाग आहे. संरक्षणमंत्री मनोहर र्पीकर यांचे १४ मे रोजी व्याख्यान होणार आहे. प्रसिद्ध गायिका आरती अंकलीकर-टिकेकर २ मे रोजी तर, राष्ट्रीय पुरस्कारविजेता गायक महेश काळे ८ मे रोजी श्रोत्यांशी संवाद साधणार आहेत, अशी माहिती सभेच्या कार्यवाह गीताली टिळक-मोने आणि मंदार बेडेकर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त तीन व्याख्याने होणार आहेत. ‘भारतीय राज्यघटनेतील सेक्युलॅरिझमचा अर्थ’ या विषयावर २९ एप्रिल रोजी प्रा. शेषराव मोरे यांचे व्याख्यान, तर ५ मे रोजी प्रकाश आंबेडकर यांचे आणि १३ मे रोजी जयदेव गायकवाड यांचे व्याख्यान होणार आहे. ‘मराठी भाषा-सद्य:स्थिती आणि आव्हाने’ या विषयावर प्रा. वीणा सानेकर आणि ‘साहित्य संमेलनांवर बोलू काही’ या विषयावर प्रा. मििलद जोशी यांचे व्याख्यान होणार आहे. डॉ. माधवी वैद्य आणि सहकारी १९ मे रोजी ‘सहोदर’ हा कार्यक्रम सादर करणार आहेत.
रानडे दाम्पत्याच्या कार्याचे स्मरण
न्यायमूर्ती रानडे यांनी स्थापन केलेल्या वक्तृत्वोत्तेजक सभा, वेदशास्त्रोत्तेजक सभा, ग्रंथोत्तेजक सभा, प्रार्थना समाज आणि सेवासदन सोसायटी या पाच संस्थांनी एकत्र येऊन २६ एप्रिल रोजी रानडे आणि रमाबाई रानडे यांच्या योगदानाचे स्मरण करण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे. यंदा ‘समाजभान अभियाना’मध्ये आनंदवन परिवाराचे डॉ. विकास आमटे आणि डॉ. कौस्तुभ आमटे सहभागी होणार आहेत.