‘पुणे तिथे काय उणे’ असं पुण्याबाबत नेहमी म्हटलं जातं, याचा प्रत्यय आज आला. वटपौर्णिमा असल्याने जन्मोजन्मी हाच पती मिळावा म्हणून महिला वटवृक्षाला सात फेरे मारतात. परंतु महिला देखील पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. त्यामुळे पुरुषांनी चक्क वटवृक्षाला सात फेऱ्या मारून जन्मोजन्मी हीच पत्नी मिळावी म्हणून प्रार्थना केली आहे. दोन वर्षांपासून हा उपक्रम करोनामुळे खंडित झाला होता. तो पुन्हा सुरू करण्यात आला आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातील पिंपळे गुरव येथे मानवी हक्क आणि संरक्षण जागृतीच्या वतीने महिला आणि पुरुषांनी एकत्र येऊन वटवृक्षाला प्रदक्षिणा घातल्या. यावेळी हलगी वादक देखील उपस्थित होते. महिला आणि पुरुषांनी एकत्र येऊन हा उपक्रम राबवला आहे. मानवी हक्क आणि संरक्षण जागृती आण्णा जोगदंड म्हणाले की, अशा प्रकारे गेल्या सात वर्षांपासून पुरुष वटपौर्णिमा साजरी करत आहेत.
स्त्रीया सुद्धा पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करतात. शेतीपासून नासा सारख्या संस्थेपर्यंत सर्वत्र स्त्रियांचा सहभाग आहे. राजकारणात देखील महिला सक्रिय आहेत. सात जन्म हाच पती मिळावा म्हणून महिला वटवृक्षाला फेऱ्या मारतात. हीच समानता आहे का? त्यामुळं आम्ही ठरवलं मग पुरुषांनी देखील वटपौर्णिमा साजरी केली पाहिजे. म्हणून वटवृक्षाला सात फेऱ्या मारतो. जन्मो जन्मी हीच पत्नी मिळावी म्हणून प्रदक्षिणा घालतो, असं उपस्थित पुरुषांनी सांगितलं.