पुणे : ‘फॉक्सकॉन प्रकल्प आता गुजरातला गेला आहे. कुणीही, कितीही प्रयत्न केले तरी आता तो प्रकल्प राज्यात पुन्हा येणार नाही. राज्यातील सत्ताधारी सांगत आहेत, यापेक्षा मोठा प्रकल्प पंतप्रधान मोदी राज्याला देणार आहेत. ही राज्याची दिशाभूल आहे. नाराज झालेल्या लहान मुलाला तुला त्याच्यापेक्षा मोठा फुगा आणून देतो, असे म्हणण्याचा हा प्रकार आहे. अशा प्रकारे जनतेची दिशाभूल करू नका,’ अशी अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केली.
हेही वाचा >>> Vedanta Foxconn पंतप्रधान मोदींनी गैरपद्धतीने वेदान्त-फॉक्सकॉन गुजरातला नेला; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची टीका
पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत पवार म्हणाले, केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा सत्तेत आहेत. त्यामुळे गुजरातला असे प्रकल्प जाणार, त्यात काही नवे नाही. पुणे परिसरातील चाकण आणि रांजणगाव एमआयडीसी देशाचे ऑटो मोबाइल हब आहे. तळेगावमध्ये पायाभूत सुविधा चांगल्या आहेत. त्यामुळे हा प्रकल्प तळेगावात झाला असता तर फॉक्सकॉनलाच फायदा झाला असता. पण, गुजरातमध्ये पायाभूत सुविधा कमी असतानाही प्रकल्प तिकडे गेला, यामागे राजकीय कारण आहे. मोदी आणि अमित शहा केंद्रात सत्तेत आहेत, तोपर्यंत गुजरातमधील गुंतवणूक वाढणारच आहे. मी मुख्यमंत्री असताना उद्योजकांशी दैनदिन संवाद साधत होतो.
हेही वाचा >>> “हे रात्री बावचळून उठतात, खोकं..”, अजित पवारांची एकनाथ शिंदे गटावर टोलेबाजी!
राज्यात आर्थिक गुंतवणुकीला पोषक वातावरण तयार केले होते. आता पुन्हा गुंतवणुकीचा वेग वाढवायचा असेल, तर राज्यात पोषक वातावरण तयार केले पाहिजे. एमआयडीसी परिसरातील गुंडगिरी मोडून काढली पाहिजे.
गणपती गेले आता नवरात्र येईल..
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गणपती मंडळांना भेटी देत आहेत. त्यांच्या बरोबर असलेल्या आमदारांच्या मतदारसंघात जाऊन मेळावे घेत आहेत. आता नवरात्र येईल, असा टोलाही पवार यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला.
विरोधी पक्षांच्या ऐक्याविषयी चर्चा सुरूच नाही!
राष्ट्रीय पातळीवर भाजपविरोधात सर्व विरोधी पक्षांनी एकत्र यावे, हा विचार आहे. त्या बाबत ठोस चर्चा झालेली नाही. नितीशकुमार, ममता बॅनर्जी, के चंद्रशेखर राव आदींनी एकत्र येऊन चर्चेला सुरुवात करण्याची गरज आहे. काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत सहभागी व्हायचे की नाही, याबाबत अजून राष्ट्रवादी काँग्रेसने निर्णय घेतलेला नाही, असेही पवार म्हणाले.