स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मृती सुवर्ण महोत्सवाच्या वर्षांत अंदमानमध्ये होत असलेल्या विश्व साहित्य संमेलनाचे उद्घाटन शनिवारी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. उद्घाटनापूर्वी ग्रंथ दिंडीही काढण्यात येणार असून, पुढील दोन दिवस साहित्याचा हा विश्वमेळा रंगणार आहे.
ऑफबीट डेस्टिनेशन व महाराष्ट्र मंडळ यांच्या वतीने या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. उद्घाटनाला स्वागताध्यक्ष व खासदार राहुल शेवाळे, केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गिते, खासदार संजय राऊत, अंदमान निकोबारचे लेफ्टनंट जनरल ए. के. सिंह आदी उपस्थित राहणार आहेत. उद्घाटनापूर्वी सेल्युलर जेल ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहादरम्यान सनई चौघडा, रांगोळीच्या पायघडय़ा टाकून ग्रंथ दिंडी काढली जाणार आहे. अंदमानातील मराठीजन व वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेले साहित्यप्रेमी मराठमोळ्या पोशाखात ग्रंथिदडीत सहभागी होणार आहेत.
उद्घाटनाच्या सोहळ्यानंतर सावरकरांच्या ‘तेजस्वी तारे’ या पुस्तकावर आधारित कार्यक्रम, निकोबारच्या आदिवासी मुलींचे नृत्य, सेल्युलर जेलच्या क्युरेटर डॉ. रशीदा इक्बाल, अर्चना हर्षे यांचे व्याख्यान तसेच ‘मला उमगलेले सावरकर व अभिव्यक्ती स्वातंत्र्य’ या विषयावरील परिसंवाद हे कार्यक्रम शनिवारी होणार आहेत.
सेल्युलर जेलमध्ये घुमले ‘जयोस्तुते’चे सूर
काळ्या पाण्याची शिक्षा भोगताना झालेल्या छळाचा इतिहास.. सेल्युलर जेलमधील सावरकरांची कोठडी पाहून सर्वाच्या मनी दाटून आलेली देशभक्ती.. या भारावलेपणातच ‘जयोस्तुते’च्या गीताचे सूर घुमले अन् उपस्थितांनी सावरकरांना मानवंदना दिली. विश्वसाहित्य संमेलनासाठी अंदमानात आलेल्या साहित्यप्रेमींनी शुक्रवारी सेल्युलर जेलला भेट दिली. जेलमधील फाशीची खोली, अंधार कोठडी, काळ्या पाण्याच्या शिक्षेत कोलू ओढतानाची सावरकरांची प्रतिकृती.. हे सारे पाहून सर्वच भारावले अन् ‘स्वतंत्रते भगवती’ हे गीत म्हणत सावरकरांना अभिवादन केले. सावरकरांच्या साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक व संमेलनाध्यक्ष प्रा. शेषराव मोरे, आमदार नीलम गोऱ्हे व सामाजिक समरसता मंचचे दादा इदाते यांनी जेलला भेट देऊन सावरकरांच्या खोलीचे दर्शन घेतले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा