कपूर समितीच्या अहवालातील एका परिच्छेदाचा दाखला देऊन महात्मा गांधींच्या हत्येमध्ये सावरकरांचा हात असल्याबाबत जाणीवपूर्वक प्रचार केला जात आहे. केंद्रात व राज्यामध्ये सध्या सावरकरद्वेषी सरकार नसल्याने उच्च न्यायालयात याचिका दाखल करून हा परिच्छेद रद्द करावा, अशी मागणी चौथ्या विश्व साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. शेषराव मोरे यांनी केली. सावरकरांवरील हा कलंक दूर करण्यासाठी सावकरवाद्यांनी पुढे यावे, असे आवाहनही त्यांनी केले.
ऑफबीट डेस्टिनेशन व महाराष्ट्र मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विश्व साहित्य संमेलनाचा रविवारी समारोप झाला. त्या वेळी ते बोलत होते. प्रा. मोरे म्हणाले, गांधी हत्येच्या आरोपातून न्यायालयाने सावरकरांची निर्दोष मुक्तता केली होती. त्यानंतर सावरकर हयात नसताना गांधी हत्येची चौकशी करण्यासाठी सरकारने कपूर समितीची नेमणूक केली होती. सावरकरवाद्यांनी सावरकरांच्या सांगण्यावरून गांधींची हत्या केल्याचा उल्लेख या समितीने जाता जाता नमूद केला. मात्र, अहवालाच्या दोन खंडांमध्ये या संदर्भातील एकही पुरावा समितीने दिलेला नाही. समितीला असा उल्लेख करण्याचा अधिकार नव्हता, मात्र अहवालातील त्याच परिच्छेदाचा आधार घेऊन सावरकरांच्या विरोधात लिहिले जाते. न्यायालयाने सावरकरांना निर्दोष मुक्त केले असल्याने गांधी हत्येत त्यांचा हात होता, असे कुणी म्हणत असेल तर त्याबाबत पोलिसांत तक्रार केली पाहिजे. भारत छोडो आंदोलनापासून स्वातंत्र्यलढय़ाची पुनर्माडणी करावी लागणार आहे. सावरकरांना सोडून देशाला एकही पाऊल पुढे टाकता येणार नाही. त्यामुळे बुद्धिवादी व हिंदुत्वहिताची दृष्टी सोडून नये. सावरकरांवर लिहिणे एके काळी गुन्हा ठरत होता. मात्र, सावरकर आता त्यांच्या अनुयायांपुरतेच मर्यादित राहिले नाहीत. महाराष्ट्रात वैचारिक परिवर्तत होत असून, हे विश्व साहित्य संमेलन त्याची नांदी आहे. त्यामुळे हे विश्व साहित्य संमेलनच नव्हे, तर सावरकर मराठी राष्ट्रीय संमेलन झाले आहे.
संमेलनाचे स्वागताध्यक्ष राहुल शेवाळे, कला व सांस्कृतिक विभागाचे प्रमुख आर. देविदास, खासदार विष्णुपद रे यांच्या पत्नी रूपा रे, ८८ व्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनील महाजन, महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष गोरखनाथ पाटील, सचिव अरविंद पाटील आदी त्या वेळी उपस्थित होते.

Story img Loader