पुणे : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी लोकसभेचे विरोधी पक्षनेते, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी खटल्याच्या सुनावणीस उपस्थित राहण्याबाबत कायमस्वरुपी सूट मिळावी, असा अर्ज न्यायालयात दाखल केला. विशेष न्यायाधीश अमोल शिंदे यांनी गांधी यांचा अर्ज मंगळवारी मंजूर केला. न्यायालयाच्या आदेशामुळे गांधी यांना दिलासा मिळाला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी सावरकर यांचे नातू सात्यकी यांनी राहुल गांधी यांच्याविरुद्ध मानहानीचा दावा दाखल केला होता.

या प्रकरणात गांधी यांना १० जानेवारी राेजी न्यायालयात उपस्थित राहण्याबाबतचे आदेश न्यायालायने दिले होते. त्यानुसार गांधी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे (व्हिडीओ काॅन्फरसिंग) विशेष न्यायालयात सुनावणीसाठी उपस्थित रााहिले. वैयक्तिक २५ हजारांच्या जात मुचलक्यावर गांधी यांचा जामीन मंजूर करण्यात आला. गांधी यांचे वकील ॲड. मिलिंद पवार यांनी या दाव्यात गांधी यांना सुनावणीदरम्यान न्यायालयात हजर राहण्यापासून कायमस्वरूपी सूट मिळावी, असा अर्ज न्यायालयात दाखल केला होता. सुनावणीदरम्यान आरोपीचे वकील आरोपीला वेळोवेळी आवश्यक सूचना देतील, अशा अटी शर्तींवर विशेष न्यायालयाने गांधी यांचा अर्ज मंजूर केला.

ॲड. पवार यांनी या खटल्याची पुढील सुनावणी ‘समरी ट्रायल’ ऐवजी ‘समन्स ट्रायल’ म्हणून घेण्यात यावी, असा अर्ज मंगळवारी सादर केला. हा खटला स्वातंत्र्यपूर्व ऐतिहासिक घटनांवर अवलंबून आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे स्वातंत्र्य चळवळीतील योगदान आणि भूमिकेचा लेखाजोखा आणि ऐतिहासिक वस्तुस्थिती न्यायालयासमोर येणे नैसर्गिक न्यायाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. न्यायालयाने समन्स बजावल्यानंतर निबंधकांनी खटल्याची नोंद चुकीने ‘समरी ट्रायल’ अशी केली आहे. त्याऐवजी या खटल्याची नोंद ‘समन्स ट्रायल’ म्हणून केल्यास बचाव पक्षाला विस्तृतपणे उलटतपासणी घेता येईल, तसेच स्वातंत्र्यपूर्व काळातील महत्त्वाचे ऐतिहासिक दस्तावेज पुरावा म्हणून न्यायालयासमोर मांडता येईल, असे अर्जात म्हटले आहे. या अर्जावर सात्यकी सावरकर यांचे वकील ॲड. संग्राम कोल्हटकर यांनी त्यांचे म्हणणे सादर करावे, अशी सूचना न्यायलयाने दिली. याप्रकरणात पुढील सुनावणी २५ फेब्रुवारी रोजी होणार आहे.

Story img Loader