फर्ग्युसन महाविद्यालयाचे वसतिगृह.. ब्लॉक नं १, खोली क्रमांक १७.. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा काही काळापुरताचा हा पत्ता! फर्ग्युसन महाविद्यालयातील ही खोली अनेक महत्त्वाच्या घटनांची साक्षीदार आहे. डेक्कन एज्युकेशन सोसायटीने ही खोली जतन करून ठेवली आहे. सावरकरांच्या पुण्यतिथी आणि जयंतीदिनी ही खोली सर्वाना पाहण्यासाठी खुली केली जाते.
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी महाविद्यालयीन शिक्षणासाठी फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये १९०२ साली प्रवेश घेतला. त्यानंतर फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मुलांच्या वसतिगृहामध्ये ते १९०५ सालापर्यंत राहत होते. सध्या वसतिगृहातील ब्लॉक क्र. १ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इमारतीतील १७ क्रमांकाच्या खोलीमध्ये सावरकर राहत असत. महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतलेला एक विद्यार्थी ते ‘बंडखोरी’मुळे महाविद्यालय सोडावे लागलेले स्वातंत्र्यवीर. या प्रवासाची साक्षीदार म्हणजे फर्ग्युसन महाविद्यालयातील ही खोली. विद्यार्थिदशेतील सावरकर.. मित्रांबरोबर गप्पा मारणारे सावरकर आणि बंडखोर विद्यार्थी म्हणून महाविद्यालयातून काढून टाकलेले सावरकर.. आणि त्यानंतर बीए पूर्ण करून शिकण्यासाठी परदेशी जाण्याचा निर्णय घेणारे सावरकर.. असे अनेक प्रसंग या खोलीने पाहिले आहेत. सावरकरांच्या आयुष्यातील अनेक महत्त्वाच्या घडामोडी त्यांच्या फर्ग्युसन महाविद्यालयाच्या वसतिगृहामधील वास्तव्याच्या काळात घडल्या.
फर्ग्युसन महाविद्यालयाच्या या खोलीत अगदी धर्मचिंतन, राजकारण, समाजकारण अशा अनेक विषयांचे खल होत. तरुण वयातील सावरकरांनी जेव्हा फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला, तेव्हा लोकमान्य टिळक, बिपीनचंद्र पाल, लाला लजपतराय यांच्या विचारांचा प्रभाव त्यांच्यावर होता. या तिघांपासून प्रेरणा घेऊन सुरू केलेल्या स्वदेशीच्या चळवळीचा विचार पुढे आला, तो याच वसतिगृहातील खोलीमध्ये. दसऱ्याच्या दिवशी पुण्यात परदेशी कपडय़ांची होळी केली गेली, ती होळीची कल्पना याच खोलीतील. त्या कार्यक्रमाचे नियोजनही इथेच बसून झाले. हळूहळू ही खोली स्वातंत्र्याच्या भावनेने प्रेरित झालेल्या पुण्यातील त्या वेळच्या तरुणाईचा अड्डा झाली आणि त्यातूनच उभी राहिली ‘अभिनव भारत संघटना’!
सावरकरांच्या आयुष्यातील या सगळ्या घडामोडींच्या उपलब्ध आठवणी डेक्कन एज्युकेशन सोसायटीने या खोलीत जपून ठेवल्या आहेत. सावरकरांची पुस्तके, त्यांच्या काही वस्तू, दुर्मीळ छायाचित्रे, त्यांचा अंगरखा अशा वस्तू या खोलीत ठेवण्यात आल्या आहेत. सावरकरांच्या पुण्यातील स्मारकांपैकी हे एक छोटेखानी; पण महत्त्वाचे स्मारक आहे. वर्षभर गजबजलेल्या वसतिगृहातील इतर खोल्यांना आजही ही खोली प्रेरणा देत आहे.

Story img Loader