चीन आणि पाकिस्तानव्याप्त भारताची जमीन परत मिळालीच पाहिजे, त्या दृष्टीने विचार होण्याची गरज आहे. विचार प्रक्रिया सुरू झाली की मार्गही सापडेल, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य इंद्रेशकुमार यांनी निगडीत केले. स्वाभिमानी भारताची उभारणी व्हावी, अशी अपेक्षाही त्यांनी या वेळी व्यक्त केली.
स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या वतीने स्वामी चैतन्यानंद आणि सचिन टेकवडे यांना ‘सावरकर पुरस्कार’ देऊन गौरवण्यात आले, तेव्हा ते बोलत होते. बांधकाम व्यावसायिक एस. बी. पाटील, सदाशिव रिकामे, विनोद बन्सल आदी उपस्थित होते.
इंद्रेशकुमार म्हणाले,की भारतात राहून ‘पाकिस्तान जय’ची भाषा होता कामा नये. स्वातंत्र्यानंतर भारतभूमीवर अतिक्रमण झाले असून ते काढले पाहिजे. भारतात सोन्याचा धूर निघत होता, असे सांगितले जाते. आजमितीला भ्रष्टाचार, बलात्कार, काळा पैसा, आतंकवाद, दंगली, भेसळीचा देश अशी प्रतिमा झाली आहे, ती बदलण्याचे आव्हान आपल्यासमोर आहे. भारतात जीवनमूल्यांची जपवणूक होते. मातृभूमीला बलिदानाचा इतिहास आहे. अमेरिका व चीन विश्वगुरू होऊ शकत नाहीत, कारण ती परंपरा भारतात आहे. जगभरातील देशांमध्ये विविध राज्यव्यवस्था आढळून येते. मात्र, भारत असा एकमेव देश असेल, ज्या ठिकाणी विदेशी भाषेत संसद चालवली जाते. या अपमानातून भारत मुक्त कधी होणार? मातृभूमीचा गौरव होणे अपेक्षित असताना ही क्रूर चेष्टा कशासाठी, असे ते म्हणाले. प्रास्ताविक व सूत्रसंचालन भास्कर रिकामे यांनी केले. आभार विनोद बन्सल यांनी मानले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा