एखाद्या विषयाने झपाटून जाणे आणि त्यासाठीच आपले आयुष्य आहे, या भावनेतून काम करणाऱ्यांची संख्या विरळाच. पुण्यामध्ये असे विषयाला वाहून घेतलेल्या अनेक व्यक्ती सहजगत्या आढळून येतात. आचार्य अत्रे म्हटलं की पटकन डोळ्यासमोर नाव येते ते बाबूराव कानडे यांचेच. तसे स्वातंत्र्यवीर सावरकर हे नाव उच्चारताच चटकन आठवतात ते ‘सावरकर’मय झालेले विद्याधरपंत नारगोलकर.
सर्वसाधारण कुटुंबातील मुलगा. वयाच्या दहाव्या वर्षी केसरीवाडय़ामध्ये आलेल्या स्वातंत्र्यवीरांना भेटायला जातो. आपल्याकडील वही पुढे करून त्या मुलाने तात्यारावांकडे (सावरकर) सही मागितली. सावरकरांनी त्याला स्पष्ट नकार दिला. अर्थात हा नकार पचवून त्या मुलाने पुढे सावरकरांचे समग्र वाङ्मय केवळ वाचले असे नाही, तर या साहित्याचा अभ्यास केला. या मुलाचे नाव विद्याधर नारगोलकर. किलरेस्कर ऑईल इंजिनमधील नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर केवळ स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जाज्वल्य विचारांचा आणि साहित्याचा प्रचार आणि प्रसार हेच त्यांच्या जीविताचे ध्येय झाले. त्यासाठी त्यांनी सावरकर स्मृती प्रतिष्ठानची स्थापना केली आहे. या कामामुळे कार्यकर्ते त्यांना प्रेमाने आणि आदराने ‘विद्याधरपंत’ असेच संबोधतात. रत्नागिरी येथे दामले यांच्या घरी सावरकर यांचा मुक्काम असायचा. याच घरामध्ये त्यांची आणि डॉ. हेडगेवारांची भेट झाली होती. या घराचे दामले यांनी तसेच जतन केले असून त्या स्थानाचे दर्शन घेण्याचे भाग्य मला लाभले याचा आनंद त्यांना आहे.
सावरकर हे मराठी भाषेच्या वापरासाठी आग्रही होते. त्यामुळे शाळकरी वयात त्यांच्यापुढे वही धरताना ‘आपण स्वाक्षरी द्याल का’ असे विचारायला हवे होते, असे आता मला मागे वळून पाहताना ध्यानात येते. सावरकर यांनी लिहिलेले साहित्य, सावरकर यांच्यावरील गौरवपर लेखन, टीकात्मक स्वरूपाचे लेखन असे सगळे साहित्य मी वाचन केले आहे. एवढेच नव्हे, तर या साहित्याचा अभ्यास केला आहे, असे नारगोलकर यांनी सांगितले. सावरकर वाङ्मयाविषयीची व्याख्याने, नावामध्ये हिंदूू हा शब्द असलेल्या संस्था-संघटनांच्या कार्यक्रमांमध्ये आणि हिंदूूंवर होणाऱ्या अन्यायाविरोधातील आंदोलनांमध्ये उत्स्फूर्त सहभाग अशीच विद्याधरपंतांची दिनचर्या असते. सध्याच्या धावपळीच्या युगात सावरकर वाङ्मयाचे समग्र वाचन करणे शक्य नाही, हे ध्यानात घेऊन या विचारांवर आधारलेल्या ‘सावरकरांची भाकिते’ आणि ‘हीच आमची अस्मिता आणि आकांक्षा’ या छोटेखानी पुस्तिकांची निर्मिती केली आहे. या पुस्तिकांचा हिंदी, कानडी, गुजराती आवृत्त्या निघाल्या आहेत. एका कार्यक्रमासाठी आलेल्या नरेंद्र मोदी यांनी ही पुस्तिका पाहून माझ्या पाठीवर कौतुकाची थाप दिली आणि माझ्या प्रतीवर त्यांनी अभिप्रायदेखील दिला. त्या वेळी गुजरातचे मुख्यमंत्री असलेले मोदी आता पंतप्रधान झाले याचा आनंद माझ्यासारख्या सावरकरभक्ताला निश्चितपणे झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा