चक्क गुलाबी रंगाचे नवलकोल, गुलाबीसर वांगे, गुलाबी चाकवत.. आकर्षक रंगांच्या आणि आपल्या नेहमीच्या भाज्यांपेक्षा थोडय़ा वेगळ्या दिसणाऱ्या काश्मिरी भाज्यांचे उत्पादन आता पुण्यात उरुळीकांचनमध्ये होत असून शहरातील मूळच्या काश्मिरी नागरिकांबरोबरच इतरांकडूनही या भाज्यांना उत्तम प्रतिसाद मिळू लागला आहे.
या भाज्यांचे उत्पादन घेणारे शेतकरी सूर्यकांत बगाडे आणि शिवाजीराव बगाडे यांनी ही माहिती दिली. सध्या पुण्यात या भाज्या नियमित खरेदी करणारे १५० ग्राहक असल्याचे बगाडे यांनी सांगितले.
साग, स्वचल, वस्तहाक, वारेमूठ, कडम, हंद अशा वैशिष्टय़पूर्ण नावांच्या या भाज्या दिसायलाही वेगळ्या आहेत. या भाज्या जम्मू-काश्मीरमध्येच प्रामुख्याने मिळतात. काही प्रमाणात दिल्लीतही त्या उपलब्ध होतात. राज्यात मात्र केवळ उरुळीकांचनमध्येच या भाज्यांचे उत्पादन होत असल्याचे सूर्यकांत बगाडे यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘‘आपल्याकडील तापमान काश्मिरी भाज्यांना फारसे सोईचे नाही. तरीही कडक उन्हाळ्याचा मे महिना सोडल्यास इतर अकराही महिने या भाज्यांचे उत्पादन घेता येते. जूनमध्ये पाऊस सुरू झाल्यावर या भाज्यांनी लागवड सुरू होते ती एप्रिलपर्यंत करता येते. आम्ही पुण्यासह मुंबई, बंगळुरु, हैदराबादलाही भाज्या पाठवतो. अगदी अमेरिकेलाही या भाज्या लोक घेऊन गेले आहेत. प्रामुख्याने काश्मिरी लोक घरगुती वापरासाठी या भाज्या खरेदी करतात. या भाज्यांत प्रथिने आणि लोहाचे प्रमाण उत्तम असल्यामुळे आणि वेगळेपणामुळे इतर लोकांमध्येही त्यांची लोकप्रियता हळूहळू वाढत आहे. सर्वसाधारणपणे किलोमागे १०० रुपयांपासून या भाज्या मिळतात. या भाज्यांमधील प्रथिने व लोहाच्या प्रमाण तपासून घेण्यात आले असून सागमध्ये १८ टक्के तर स्वचलमध्ये २५ टक्के प्रथिने असतात. या दोन्ही भाज्या लोहयुक्त आहेत. तसेच हंद या भाजीत ४० टक्के लोह असते.’’
या भाज्या पुण्यात कशा आल्या याची बगाडे यांनी सांगितलेली कथाही मोठी रंजक आहे. मूळचे काश्मीरचे असलेले आणि सुमारे ७ वर्षांपूर्वी पुण्यात काम करणारे ज्येष्ठ पत्रकार जे. एन. रैना यांनी या भाज्या प्रथम पुण्यात आणल्या. महाराष्ट्रातील काश्मिरी लोकांना काश्मिरी भाज्या खायला मिळाव्यात अशा हेतूने त्यांनी काश्मिरी भाज्यांची काही रोपे आणून हरिविजय कांचन या नर्सरीचालकांकडे दिली. बागडे यांना वेगळ्या भाज्या लावून पाहण्याची आवड असल्यामुळे त्यांनी ती रोपे घेऊन एक गुंठय़ात प्रायोगिक तत्तवावर काश्मिरी भाज्यांची लागवड करून पाहिली. मागणी वाढल्यावर भाज्यांचे उत्पादनही वाढले.
या आहेत काश्मिरी भाज्या :
काश्मिरी साग- फ्लॉवरच्या पानांसारखी दिसणारी भाजी
स्वचल- मेथीसारखी दिसणारी एक भाजी
वस्तहाक- लाल-गुलाबी रंगाची चाकवतसारख्या पानांची भाजी
वारेमूठ- आपल्याकडील पांढऱ्या चवळीसारखीच दिसणारी काळी चवळी
कडम- गुलाबी रंगाचे नवलकोल
हंद- सॅलडच्या पानांसारखी भाजी
काश्मिरी टोमॅटो, काश्मिरी वांगे
काश्मिरी भाज्या.. चक्क पुण्यातही!
आपल्या नेहमीच्या भाज्यांपेक्षा थोडय़ा वेगळ्या दिसणाऱ्या काश्मिरी भाज्यांचे उत्पादन आता पुण्यात उरुळीकांचनमध्ये होत असून शहरातील मूळच्या काश्मिरी नागरिकांबरोबरच इतरांकडूनही या भाज्यांना उत्तम प्रतिसाद मिळू लागला आहे.
Written by लोकसत्ता टीम
Updated:
First published on: 11-06-2014 at 03:25 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vegetable kashmir uruli kanchan