पुणे : पितृपंधरवड्यामुळे विविध प्रकारच्या भाज्यांना मागणी वाढली आहे. त्यामुळे विविध प्रकारच्या भाज्यांच्या दरात १० ते २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. भाज्यांचे दर पंधरा दिवस तेजीत राहणार असून, नवरात्रौत्सवात भाज्यांच्या दरात घट होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
पितृपंधरवडा सुरू झाल्यानंतर भाज्यांच्या मागणीत वाढ झाली आहे. मागणीच्या तुलनेत भाज्यांची आवक कमी होत असल्याने भाज्यांचे दर तेजीत आहेत. येत्या काही दिवसांत भाज्यांच्या मागणीत वाढ होणार आहे. पितृपंधरवड्यात गवार, भेंडी, कारली, देठ, आले, अळू, काकडी या भाज्यांच्या मागणीत वाढ होते. घाऊक आणि किरकोळ बाजारात चांगल्या प्रतीच्या भाज्यांचे दर तेजीत असल्याची माहिती श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील ज्येष्ठ अडते विलास भुजबळ यांनी दिली.
पुणे विभागातून भाज्यांची आवक होत आहे. मध्यंतरी झालेल्या पावसाने भाज्यांच्या लागवडीवर परिणाम झाला आहे. पावसाने उघडीप दिल्यानंतर आवक वाढली आहे. विविध प्रकारच्या भाज्यांना मागणी वाढली असून, भाज्यांची प्रतवारी चांगली आहे, असे त्यांनी सांगितले.
पेरू, केळी, डाळिंबालाही मागणी
पितृपंधरवड्यात फळांनाही मागणी वाढते. पेरू, केळी आणि डाळिंबाला मागणी वाढली आहे. त्यामुळे घाऊक आणि किरकोळ बाजारात पेरू, केळी, डाळिंबाच्या दरात वाढ झाली आहे. पेरू आणि केळीच्या तुलनेत डाळिंबाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. घाऊक बाजारात डाळिंबाचा प्रतिकिलोचा दर प्रतवारीनुसार १०० ते ३०० रुपये आहे. एक डझन केळीचा दर ६० ते ८० रुपये दरम्यान आहेत. पेरूचे किलोचे दर २० ते ५० रुपये असल्याचे मार्केट यार्डातील फळ व्यापारी युवराज काची यांनी सांगितले.
हेही वाचा – पुण्याला मिळणार मोठा मान… जानेवारीमध्ये लष्कराचा महत्त्वाचा कार्यक्रम
किरकोळ बाजारात भाज्यांचे किलोचे दर
गवार – १२० रुपये
भेंडी – ८० रुपये
कारली – ८० रुपये
काकडी – ८० रुपये
देठ- २० रुपये (एक नग)
अळूची पाने- २० रुपये जुडी