शहरी भागात रानभाजी महोत्सव होत असल्यामुळे त्याचं अप्रूप आहे. पुण्यातील निसर्ग सेवक संस्था आणि मॉडर्न महाविद्यालयाने आयोजित केलेल्या या महोत्सवात रानभाज्यांची चव चाखण्याबरोबरच ग्रामीण चवीचं जेवणही चाखण्याची संधी मिळणार आहे, शिवाय रानभाज्यांची सांगोपांग माहितीही महोत्सवात मिळणार आहे. हे या महोत्सवाचं वेगळेपण आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या ‘खाऊखुशाल’मध्ये थोडा वेगळा विषय. हा विषय आहे एका महोत्सवाचा. या महोत्सवाबाबत आजच सांगायला हवं. कारण हा महोत्सव जरी पुढच्या महिन्यात ८ आणि ९ सप्टेंबर असे दोन दिवस होणार असला, तरी त्यासाठीची नोंदणी २० ते ३१ ऑगस्ट या कालावधीत करायची आहे. त्यामुळे या महोत्सवात जाण्याचं आणि त्यासाठी नोंदणी करण्याचं आताच ठरवावं लागेल. या महोत्सवाचं नाव आहे रानभाजी महोत्सव. मॉडर्न कला, विज्ञान, वाणिज्य महाविद्यालय आणि निसर्ग सेवक, पुणे यांनी एकत्र येऊन या आगळ्या महोत्सवाचं आयोजन केलं आहे. मॉडर्न महाविद्यालयातच हा महोत्सव होणार असून पहिल्या दिवशी दुपारी बारा ते सायंकाळी पाच आणि दुसऱ्या दिवशी दुपारी बारा ते चार अशी महोत्सवाची वेळ आहे.  अशा प्रकारचा महोत्सव आदिवासी भागात गेल्या काही वर्षांपासून अन्यही काही संस्थांतर्फे आयोजित केला जात आहे आणि त्याला प्रतिसादही चांगला मिळू लागला आहे. शहरातून अनेक जण मुद्दाम अशा उपक्रमांमध्ये सहभागी होतात. मात्र शहरात अशाप्रकारचा महोत्सव होत असल्यामुळे त्याचं नक्कीच अप्रूप आहे.

शहरात होत असलेला हा तसा पहिलाच महोत्सव आहे आणि रानभाज्यांची चव चाखण्याबरोबरच या भाज्यांबद्दलची सांगोपांग माहिती मुख्यत: महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना आणि महोत्सवाला येणाऱ्या नागरिकांना व्हावी, या भाज्यांबद्दल विद्यार्थ्यांच्या मनात उत्सुकता निर्माण व्हावी, हा या महोत्सवाच्या आयोजनाचा मुख्य हेतू आहे. जुन्नरजवळच्या कुकडेश्वर येथील पंधरा आदिवासी महिलांना या महोत्सवासाठी खास आमंत्रित करण्यात आलं आहे.

मुख्य म्हणजे पहिल्या दिवशी या महिला महोत्सवात येणाऱ्या सर्वाना रानभाज्यांची माहिती देणार आहेत. दुसऱ्या दिवशी या महिलांच्या हातून तयार झालेल्या रानभाज्या म्हणजेच भाजी, भाकरी, भात आणि अन्य पदार्थाच्या जेवणाचा आस्वाद घेता येईल. या भाज्या आदिवासी महिला कशा पद्धतीनं तयार करतात हेही या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. त्यामुळे हा महोत्सव चवींचं वेगळेपण जपणारा असेल. उपलब्ध जास्तीतजास्त रानभाज्या या महोत्सवात मांडल्या जातील आणि त्या बरोबरच अन्य रानभाज्या, पालेभाज्या, फळभाज्या, फुलभाज्या, कंद आदींची माहिती देणारं प्रदर्शनही महोत्सवात पाहायला मिळेल. ही माहिती उत्तम रीतीनं व्हावी यासाठी भित्तिचित्रही लावली जाणार आहेत. या प्रदर्शनातून अधिकाधिक रानभाज्यांची माहिती करून दिली जाईल. तसंच त्यांचं शास्त्रीय नाव, चित्र आणि अन्यही माहिती असेल.

मॉडर्न कला, विज्ञान, वाणिज्य महाविद्यालय, गणेशखिंड रस्ता इथे हा महोत्सव होणार असून सहभागासाठी नोंदणीचं आवाहन करण्यात आलं आहे. नोंदणी डॉ. प्राची क्षीरसागर ९९२३३६७४५२, डॉ. विनया घाटे ९९२२२१९०७७ किंवा डॉ. प्रभा भोगावकर ९४२३१२४५३० यांच्याकडे करावी. महोत्सवातील प्रदर्शन सर्वासाठी खुलं असून खाद्यपदार्थासाठी शुल्क आकारलं जाणार आहे. एका वेगळ्या उपक्रमातील सहभागासाठी महोत्सवाला जायलाच हवं.

vinayak.karmarkar@expressindia.com

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vegetables festival in pune