उन्हाळ्यामुळे मार्केट यार्डातील घाऊक बाजारात गेल्या आठवड्याच्या तुलनेत फळभाज्यांची आवक कमी झाली आहे. भुईमुग शेंग, टोमॅटो, शेवगा, टोमॅटोच्या दरात घट झाली आहे. कांदा, फ्लाॅवर, घेवड्याच्या दरात अल्पशी वाढ झाली आहे. अन्य फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहित व्यापाऱ्यांनी दिली.
हेही वाचा >>> पुणे: पिस्तूल बाळगणाऱ्या युवकाला सिंहगड रस्त्यावर पकडले
गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डात रविवारी (२८ मे) राज्य, तसेच परराज्यांतून ८० ते ९० ट्रक फळभाज्यांची आवक झाली. गेल्या आठवड्यात घाऊक बाजारात फळभाज्यांची आवक ९० ते १०० ट्रक झाली होती. उन्हाळ्यामुळे फळभाज्यांची आवक कमी झाली आहे. गुजरात, कर्नाटकमधून मिळून ८ ते १० टेम्पो हिरवी मिरची, गुजरात, कर्नाटकमधून मिळून ३ ते ४ टेम्पो कोबी, हिमाचल प्रदेशातून ५ ते ६ टेम्पो मटार, आंध्रप्रदेश आणि तमिळनाडूतून ४ ते ५ टेम्पो शेवगा, कर्नाटकातून ३ टेम्पो घेवडा, आंध्रप्रदेश आणि कर्नाटकातून मिळून तोतापुरी कैरी ५ टेम्पो, मध्य प्रदेश आणि गुजरातमधून मिळून ८ ते १० ट्रक लसूण, आग्रा, इंदूर, तसेच पुणे विभागातून मिळून २५ ते ३० ट्रक बटाटा आवक झाली, अशी माहिती घाऊक बाजारातील प्रमुख आडते विलास भुजबळ यांनी दिली. पुणे विभागातून सातारी आले ८०० ते ९०० गोणी, टोमॅटो ११ ते १२ हजार पेटी, हिरवी मिरची ४ ते ५ टेम्पो, फ्लाॅवर ८ ते १० टेम्पो, कोबी ४ ते ५ टेम्पो, भेंडी ७ ते ८ टेम्पो, गवार ५ ते ६ टेम्पो, गाजर ५ ते ६ टेम्पो, काकडी ७ ते ८ टेम्पो, ढोबळी मिरची ८ ते १० टेम्पो, गाजर ५ ते ६ टेम्पो, भुईमूग शेंग २०० गोणी, गावरान कैरी १०० गोणी, तांबडा भोपळा ८ ते १० टेम्पो, कांदा ७० ते ८० ट्रक अशी आवक झाली.