घाऊक बाजारात कोबी, फ्लॉवर, वांगी, टोमॅटो, भोपळ्याच्या दरात घट
चांगल्या पावसामुळे भाजीपाल्याचे उत्पादन वाढले
चलनतुटवडय़ामुळे किरकोळ विक्रे त्यांकडून भाजीपाल्याला मागणी नाही. यंदा पाऊस चांगला झाल्याने भाजीपाल्याचे उत्पादन चांगले झाले आहे. त्यामुळे गेल्या पंधरा दिवसांपासून भाजीपाल्याचे दर सामान्यांच्या आवाक्यात आले आहेत. गुलटेकडी मार्केट यार्डासह राज्यातील प्रमुख बाजार आवारात सध्या हेच चित्र पाहायला मिळत आहे. कोबी, फ्लॉवर, वांगी, दुधी भोपळा, लाल भोपळा, टोमॅटोचे दर उतरले आहेत. अन्य भाजीपाल्यांचे दर स्थिर आहेत.
पंधरा दिवसांपूर्वी केंद्र सरकारने पाचशे आणि हजाराच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतल्याने बाजारआवारात गोंधळाची परिस्थिती होती. शेतकऱ्यांनी पाचशे आणि हजारांच्या नोटा स्वीकारण्यास नकार दिला तसेच धनादेश किंवा ऑनलाईन पद्धतीने पैसे स्वीकारण्यास शेतकरी तयार नाहीत. त्यामुळे बाजार आवारात सुरुवातीला गोंधळाचे वातावरण पाहायाला मिळाले.
पाचशे रुपयांच्या नवीन नोटा बाजारात आल्यानंतर व्यवहार पूर्वपदावर येतील, अशी माहिती गुलटेकडीतील छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील प्रमुख विक्रेते विलास भुजबळ यांनी दिली.
किरकोळ विक्रेत्यांकडे खरेदीसाठी पुरेसे पैसे नाहीत. त्यामुळे ज्या किरकोळ विक्रेत्याची मागणी पाच पोत्यांची होती ती मागणी आता दोन पोत्यांवर आली आहे. त्यामुळे भाजीपाल्यांचे दर कमी झाले आहेत. पुण्यासह राज्यातील प्रमुख बाजारआवारात सध्या हेच चित्र पाहायला मिळाले आहे. सर्व प्रकारच्या भाजीपाल्याची चांगली आवक होत आहे.
मात्र, मागणी नसल्याने दर घसरले आहेत. यंदा पाऊस चांगला झाला आहे. त्यामुळे भाजीपाल्याचे उत्पादन चांगले झाले आहे. थंडीत वाढ झाल्यानंतर भाजीपाल्यांची आवक कमी होईल. त्यानंतर भाजीपाल्याचे भाव वाढतील, असे निरीक्षण भुजबळ यांनी नोंदविले.
कोबी दोन रुपये किलो
गुलटेकडीतील घाऊक बाजारात कोबी, फ्लॉवर, वांगी, दुधी भोपळ, लाल भोपळा, टोमॅटोचे दर घसरले आहेत. घाऊक बाजारात कोबीचा प्रतिकिलोचा भाव दोन ते सहा, फ्लॉवरचा भाव चार ते सहा, वांगी पाच ते दहा, दुधी भोपळा चार ते आठ, लाल भोपळा चार ते आठ आणि टोमॅटो चार ते आठ रुपये असा आहे.