पुलावरील उच्छादाला आळा घालण्यासाठी पोलिसांकडून गस्त
डेक्कन भागातील काकासाहेब गाडगीळ पुलाचे तरुणाईने ‘झेड ब्रीज’ असे नामकरण केले आहे. गेल्या काही वर्षांपासून या पुलाची प्रेमीयुगुलांचे भेटण्याचे ठिकाण अशी ओळख निर्माण झाली आहे. या पुलावरच वाढदिवसही साजरे केले जातात. पुलाच्या दुतर्फा दुचाकी वाहने लावली जातात. त्यामुळे या पुलावर कायम वाहतूक कोंडी होते. वाढदिवसाच्या नावाखाली बऱ्याचदा तेथे टवाळखोरांकडून उच्छाद घातला जातो. त्यामुळे पुलावर वाहने लावणाऱ्या दुचाकीस्वारांविरुद्ध वाहतूक पोलिसांकडून कारवाईची विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेमुळे पुलावरील कोंडी दूर होण्यास मदत होईल, तसेच तेथील उच्छादाला काही प्रमाणात आळा बसेल.
डेक्कन ते नारायण पेठ, सदाशिव पेठ, टिळक रस्त्यावर जाण्यासाठी काकासाहेब गाडगीळ पुलाचा दुचाकीस्वारांकडून वापर केला जातो. डेक्कन येथील संभाजी पुलावरून जाण्यास दुचाकी वाहनांना मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे डेक्कन भागातून शहराच्या मध्य भागात जाण्यासाठी दुचाकीस्वार काकासाहेब गाडगीळ पूल आणि बाबा भिडे पुलाचा वापर करतात. गेल्या काही वर्षांपासून दररोज सायंकाळी गाडगीळ पुलावर मोठय़ा संख्येने तरुण-तरुणी येतात. हा पूल म्हणजे तरुणाईच्या दृष्टीने पर्यटनाचे केंद्र बनले आहे. पुलाच्या दुतर्फा वाहने लावल्यामुळे या भागात कोंडी होते.
डेक्कन भागातील वाहतुकीचा ताण पाहता दररोज सकाळी आणि सायंकाळी या पुलाचा दुचाकीस्वारांकडून मोठय़ा प्रमाणावर वापर केला जातो. दुतर्फा वाहने लावल्यामुळे कोंडी होते, तसेच प्रेमीयुगुल रात्री उशिरापर्यंत पुलावर बसतात. पुलावर होणारे वाढदिवस सामान्यांच्या दृष्टीने त्रासदायक ठरले आहेत. पुलावर फटाके फोडले जातात. उच्छादी तरुणांकडून या भागात आरडाओरडा केला जातो. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी या बाबत वाहतूक पोलिसांकडे तक्रारी केल्या होत्या. त्यामुळे वाहतूक पोलिसांकडून या भागात कारवाई करण्यास सुरुवात केली आहे, असे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अशोक मोराळे यांनी सांगितले.
रोज तीस ते पस्तीस दुचाकीस्वारांवर कारवाई
पुलावर वाहने थांबवण्यास तसेच वाहने लावण्यास मनाई करण्यात आली आहे. झेड ब्रीजचा वापर दुचाकीस्वारांकडून मोठय़ा प्रमाणावर केला जातो. दुतर्फा वाहने लावल्यामुळे पुलावर कोंडी होते. वाहतूक पोलिसांकडून गेल्या आठवडय़ापासून झेड ब्रीज भागात दुचाकी वाहने लावणाऱ्यांवर कारवाई सुरू केली आहे. वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या दुचाकीस्वारांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. दररोज तीस ते पस्तीस दुचाकीस्वारांविरुद्ध कारवाई करण्यात येत आहे. दररोज सायंकाळी सहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत वाहतूक पोलिसांकडून गस्त घालण्यात येत आहे. वाहतूक पोलिसांच्या कारवाईमुळे पुलावर दुचाकी लावण्याचे प्रमाण कमी झाले आहे. या पुढील काळात पोलिसांकडून नियमित कारवाई करण्यात येणार आहे, असे वाहतूक शाखेच्या डेक्कन विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.