पिंपरी-चिंचवडमध्ये वाहनतोडफोडीचे सत्र सुरूच आहे. भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन गटात झालेल्या वादातून दोन ते तीन वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. ही घटना रात्री दहाच्या सुमारास मोशी येथे घडली आहे.
गेल्या काही दिवसांपासून वाहन तोडफोडीचे सत्र पिंपरी-चिंचवडमध्ये पाहायला मिळत आहे. बुधवारीदेखील के.एस.बी चौकात अज्ञात कारणावरून चार ते पाच वाहनांची तोडफोड करण्यात आली होती. यानंतर पोलिसांनी तात्काळ ॲक्शनमध्ये येऊन आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयात गेल्या काही महिन्यांपासून वाहन तोडफोडीच सत्र सुरूच आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या वाहनांना गुंड प्रवृत्ती लक्ष करत आहे. अगदी किरकोळ कारणावरून वाहनांची तोडफोड केली जात आहे. मोशीमध्ये दोन गटात झालेल्या वादातून दोन ते तीन दुचाकी वाहनांची तोडफोड करण्यात आली. भोसरी एमआयडीसी पोलीस घटनास्थळी तात्काळ दाखल झाले होते. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुलेटच्या फाडफाड आवाजावरून हा वाद झाल्याचे प्रथमदर्शी पोलीस सांगत आहेत.