पुण्यात वाहनांची संख्या झपाटय़ाने वाढत असल्याचे प्रादेशिक परिवहन कार्यालयात नोंदविल्या जाणाऱ्या नव्या वाहनांच्या संख्येवरून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. २०१५- १६ या आर्थिक वर्षांमध्ये पुण्यातील एकूण वाहनांच्या संख्येने तीन लाखांचा आकडा ओलांडला आहे. गंभीर बाब म्हणजे दहा वर्षांपूर्वी नव्या वाहनांच्या वाढीचा वेग प्रचंड वाढत चालला असून, दहा वर्षांपूर्वीच्या तुलनेत तो आता दुप्पट झाला आहे. शहरात आता दर वर्षी अडीच लाख नव्या वाहनांची भर पडत चालली आहे.
सकाळी व संध्याकाळी शहरातील रस्त्यांवर येणारी मोठय़ा प्रमाणावरील वाहने व त्यामुळे निर्माण होणारी वाहतुकीची समस्या लक्षात घेता खासगी वापरातील वाहनांची वाढ शहरासाठी एक गंभीर समस्या झाली आहे. वाहतूक कोंडीबरोबरच प्रदूषणाचाही प्रश्न निर्माण झाला आहे. शहरातील खासगी वाहनांच्या वाढीला लगाम लावण्यासाठी सार्वजनिक वाहतूक मजबूत करण्यासारखे कोणतेही ठोस उपाय होत नसल्याने दरवर्षी खासगी वाहने वाढीचा वेग वाढतच चालला असल्याचे नव्या वाहनांच्या नोंदणीवरून स्पष्ट होते आहे.
शहरामध्ये २००५-०६ मध्ये एकूण वाहनांची संख्या साडेतेरा लाखांच्या आसपास होती. त्या वेळी दरवर्षी वाहन वाढीचा वेग दीड लाखांपर्यंत होता. त्यापूर्वी २००४-०५ पर्यंत वाहन वाढीचा वेग एक लाखांच्या आसपास होता. २०१३-१४ मध्ये शहरातील एकूण वाहनांची संख्या २४ लाखांवर गेली, तर दरवर्षी वाहन वाढीचा वेग दोन लाखांच्या आसपास आला. आता शहरातील एकूण वाहनांची संख्या तीस लाखांहून अधिक झाली असून, दरवर्षी नव्या वाहनांची नोंद होण्याची संख्याही अडीच लाखांच्या पुढे गेली आहे. मागील काही वर्षांची आकडेवारी पाहता दरवर्षी शहरात नवी वाहने येण्याचा वेग वाढतच चालला असल्याने ही शहरासाठी एक धोक्याची घंटा असल्याचे सांगण्यात येते.
विशेष म्हणजे मंदीच्या काळातही वाहन खरेदी घटली नसल्याचे आकडेवारीकरून स्पष्ट होत आहे. शहराची प्रमुख सार्वजनिक वाहतूक असलेली पीएमपी बसच्या वाहतुकीची स्थिती अत्यंत वाईट अवस्थेत असल्याचे वेळोवेळी स्पष्ट झाले आहे. नोकरी, व्यवसाय व शिक्षणाच्या कारणासाठी राज्यातूनच नव्हे, तर देशाच्या विविध भागातून शहरात येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे वाहतुकीची गरज वाढली असताना सार्वजनिक वाहतुकीचा पुरेसा व चांगला पर्याय उपलब्ध नसल्याने खासगी वाहने घेण्याकडे कल वाढला आहे. त्यातून शहराच्या रस्त्यांवर दिवसेंदिवस नव्या वाहनांची भर पडत आहे.
—-
– महिन्याला वीस हजारांहून अधिक नवीन वाहनांची नोंद
– दहा हजार क्रमांकाची नवी मालिका पंधरा दिवसांत संपते
– ‘आरटीओ’कडून रोज साडेचारशे शिकाऊ वाहन परवाना
– खासगी वाहनांमध्ये ऐंशी टक्क्य़ांहून अधिक दुचाकी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा