पुणे : मेट्रो स्थानकातून बाहेर पडल्यानंतर इच्छित स्थळी पोहोचण्यासाठीची ई-स्कूट ते पॉड टॅक्सी यासारख्या वाहतुकीच्या संकल्पना नेक्सजेन मोबिलिटी प्रदर्शनाच्या माध्यमातून मांडण्यात आल्या आहेत. भविष्यातील वाहन उद्योगाचे चित्र यातून उलगडले जात आहे. कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीजच्या (सीआयआय) वतीने आयोजित नेक्सजेन मोबिलिटी हे प्रदर्शन शुक्रवारपासून पुणे इंटरनॅशनल इक्झिबिशन अँड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये सुरू झाले आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून भविष्यकालीन वाहन उद्योगाचा वेध घेण्यात आला. या प्रदर्शनात पुणेस्थित स्क्वीरल कंपनीची ई-स्कूट ही इलेक्ट्रिक सायकल सादर करण्यात आली आहे. सध्या या ई-स्कूटचा वापर आनंदनगर मेट्रो स्थानकावर प्रायोगिक पातळीवर सुरू आहे. मेट्रो प्रवासी या ई-स्कूटचा वापर आनंदनगर स्थानक ते एमआयटीदरम्यान करू शकतात. मोबाईल उपयोजनाच्या (अॅप्लिकेशन) माध्यमातून ई-स्कूटचे पैसे द्यावे लागतात. भविष्यात इतरही स्थानकांवर या सेवेचा विस्तार करण्याचे नियोजन आहे.
पॉड टॅक्सीप्रमाणे परंतु कन्व्हेअर बेल्टवरून चालणाऱ्या कारगेटू अर्बन मोबिलिटी कंपनीचा पॉड टॅक्सीचा नमुनाही प्रदर्शनात पाहायला मिळत आहे. एक किलोमीटर मेट्रो मार्गाच्या सुमारे ३०० ते ४०० कोटी रुपये खर्च होतात. याचवेळी या पॉड टॅक्सीसाठी मार्ग बनविण्यासाठी प्रतिकिलोमीटर ६० कोटी रुपयांचा खर्च येईल. अद्याप हा प्रकल्प चाचणीच्या टप्प्यात आहे. याचबरोबर लायगर मोबिलिटी कंपनीची स्वसंतुलित स्कूटरही प्रदर्शनात मांडण्यात आली आहे. ही स्कूटर चालू असतानाही स्वत:हून तोल साधून उभी राहते आणि तिचा तोल जाऊन खाली पडत नाही. स्कूटर चालविण्यास शिकणाऱ्या व्यक्तींना याचा फायदा मोठ्या प्रमाणात होऊ शकणार आहे.
हेही वाचा – पुणे : विरुद्ध दिशेने वाहन चालविणाऱ्या बेशिस्तांवर कडक कारवाई
हेही वाचा – पिंपरी : अजित पवारांना बालेकिल्ल्यात धक्का; विश्वासू शिलेदाराने सोडली साथ
असेही तंत्रज्ञान…
अनेक वेळा दुचाकीस्वार एखाद्या वाहनाला ओलांडून पुढे जात असताना त्यांना मागून आलेले वाहन दिसत नाही. दुचाकीस्वारांना मागून येणाऱ्या वाहनाचा धोका दर्शविणारी व्हॅरॉक कंपनीची यंत्रणाही प्रदर्शनात आहे. या यंत्रणेमुळे दुचाकीस्वाराला मागून येणाऱ्या वाहनांची पूर्वसूचना आरशात मिळते. त्यातून तो योग्य पद्धतीने काळजी घेऊन दुचाकी चालवू शकतो. याचबरोबर वाहनाच्या चाकातील हवा कमी होत असल्यास त्याची पूर्वसूचना देणारे व्हॅरॉकचे तंत्रज्ञानही प्रदर्शनात मांडण्यात आले आहे.