पिंपरी : शहरात गेल्या काही दिवसांपासून वाहन तोडफोडीचे सत्र सुरुच आहे. चिंचवड येथील वर्दळीच्या केएसबी चौकात बुधवारी (१२ मार्च) साडेचारच्या सुमारास चार ते पाच जणांच्या टोळक्याने दगड आणि हत्यारांनी बारा मोटारीच्या काचा फोडल्या आणि टोळके पसार झाले. रात्री उशिरापर्यंत एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

चिंचवड येथील केएसबी चौक हा शहरातील औद्योगिक पट्ट्यातील वर्दळीच्या चौकांपैकी एक महत्वाचा चौक आहे. सकाळ आणि सायंकाळच्या सुमारास या चौकात कामाला जााार्‍या-येणार्‍या कामगारांची रेलचेल असते. सतत वर्दळीचा असणारा हा चौक आहे. या चौकात पिपरी, निगडी, एमआयडीसी भोसरी आणि चिखली या चार पोलीस ठाण्यांची हद्द आहे. चौकातून गेलेल्या समतल विलगकाच्या (ग्रेडसेपरेटर) बाजूला असणार्‍या रस्त्यावर परिसरातील अनेक वाहन चालक आपली वाहने उभी करतात. बुधवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास चौकात चार ते पाच जणांचे टोळके आले. त्यांनी अचानक चौकात उभ्या असलेल्या वाहनांना टार्गेट करीत हातातील दगड व हत्यारांनी काचांची तोडफोड करण्यास सुरूवात केली. काही मिनिटात या टोळक्याने बारा मोटारीच्या काचा फोडल्या आणि टोळके पसार झाले.

एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमोल फडतरे म्हणाले, ‘चार ते पाच जणांच्या टोळकयाने रस्त्यावर उभ्या असलेल्या मोटारीच्या काचा फोडल्याची माहिती दिली. आरोपी कोण आहेत, त्यांच्या हातात नेमकी कोणती हत्यारे होती, याबाबत परिसरातील ‘सीसीटीव्ही’च्या आधारे शोध घेतला जात आहे. आरोपी लवकरच हाती लागतील’.