पिंपरी-चिंचवड शहरात पुन्हा एकदा वाहन तोडफोडीची घटना घडली आहे. अज्ञात तिघांनी कोयत्याने वाहनांची तोडफोड करत दहशत पसरविण्याचा प्रयत्न केला आहे. आज पहाटे चारच्या सुमारास चिखली परिसरातील सरस्वती शाळेजवळ ८ ते १० वाहनांची तोडफोड करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात तीन जणांनी चिखलीतील सरस्वती शाळेजवळ पार्क केलेल्या वाहनांना लक्ष करत वाहनांची तोडफोड केली. यात वाहनांच्या काचा फोडण्यात आल्या असून, सर्वसामान्य नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. हातात कोयते घेऊन तिघांनी हुल्लडबाजी करत दहशत पसरविण्याचा प्रयत्न केला. काही महिने झाले वाहन तोडफोडीचे सत्र थांबलेले होते. परंतु, ते पुन्हा सुरू होते की काय? अशी शंका उपस्थित केली जात आहे. गेल्या तीन महिन्यांपासून शहरात शांतता नांदत होती. परंतु, पुन्हा तोडफोडीच्या घटनेने पोलिसांची डोकेदुखी वाढवली आहे.
फिनिक्स मारहाण प्रकरणी पोलिसांचा हलगर्जीपणा?
हेही वाचा – पिंपरी: ताथवडेत शिवज्योत घेऊन जाणाऱ्या टेम्पोला अपघात; ३३ जण जखमी
दुसरीकडे फिनिक्स मॉलमध्ये मारहाण झाली होती. या प्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, त्या गुन्ह्यातील आरोपी अद्याप फरार आहेत. तोंडाला कपडा लावलेला असल्याने आरोपीला शोधण्यात अडथळा येत आहे. सीसीटीव्हीच्या आधारे आम्ही त्यांचा शोध घेत आहोत, अशी माहिती पोलीस उपायुक्त काकासाहेब डोळे यांनी काल पत्रकार परिषदेत दिली होती. एका संशयित इसमाचे नाव पुढे येत असून, फिनिक्समधील मारहाण कोणी केली आणि कुठल्या मोठ्या टोळीचा सहभाग आहे, हे तपासात पुढे येईल, असेदेखील त्यांनी म्हटले. परंतु, या प्रकरणात मोठा आर्थिक व्यवहार झाल्याची चर्चा पोलीस वर्तुळात सुरू आहे. त्यामुळे हे प्रकरण उजेडात आल्यानंतरच खरी बाजू पुढे येईल, हे मात्र नक्की.