लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : शहरात वाहन तोडफोडीचे सत्र कायम असून बिबवेवाडीत २५ वाहनांची तोडफोड झाल्याची घटना ताजी असतानाच येरवडा परिसरात २४ वाहनांची तर फरासखाना परिसरात चार वाहनांची तोडफोड झाली आहे. कोणतेही कारण नसताना केवळ हुल्लडबाजीसाठी वाहनांची तोडफोड केले जात असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे टवाळखोरासंह हुल्लडबाजी करणाऱ्याविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
पोलिसांनी गुन्हेगारांविरुध्द आक्रमक पवित्रा घेऊनही गुन्हेगार वठणीवर येत नसल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. वाहन तोडफोडीच्या सत्रामुळे हातावर पोट असणाऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. येरवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये लक्ष्मीनगरमध्ये तब्बल २२ चारचाकी आणि दोन दुचाकीची तोडफोड केली. ही घटना बुधवारी रात्री घडली. घटनास्थळी पोलिसांनी पाहणी केली असता, एकजण हातात धारदार शस्त्र घेऊन वाहनांची तोडफोड करताना दिसत आहे. यातील काही वाहने ही पोलीस चौकीच्या जवळच फोडण्यात आली आहेत. घटनास्थळी गुन्हे शाखा आणि पोलीस ठाण्याची पथके रवाना झाली होती.
वाहन तोडफोडीची नागरिकांमध्ये भीती
येरवडासह फरासखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये कागदीपुरा परिसरातील साततोटी चौकी येथे चार ते पाच वाहनांची तोडफोड केली आहे. त्यामुळे फरासखाना परिसरातील नागरिक देखील भीतीच्या वातावरणामध्ये आहेत. वाहनाची तोडफोडीच्या या प्रकरणात पाच आरोपी ताब्यात आहेत. पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार तरुणांनी हातात कोयता आणि बांबू घेऊन गाड्यांची तोडफोड केली.
लक्ष्मीनगर परिसरात २२ रिक्षा आणि दोन दुचाकीची तोडफोड झाली आहे. आणखी कोणाची वाहने फोडली असतील तर त्याची माहिती घेतली जात आहे. -हिम्मत जाधव पोलीस उपायुक्त, परिमंडल चार