पुणे : देशात शंभर टक्के बायोइथेनॉलवरील वाहने लवकरच धावणार आहेत. देशातील मोटार उत्पादक कंपन्यांकडून पुढील सहा महिन्यांत शंभर टक्के बायोइथेनॉलवर चालणाऱ्या मोटारी सादर करण्यात येणार आहेत. याचबरोबर बायोइथेनॉलवरील दुचाकीही लवकरच बाजारात दाखल होतील, अशी माहिती केंद्रीय परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी दिली.

प्राज इंडस्ट्रीजचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. प्रमोद चौधरी यांच्या पंचाहत्तरीनिमित्त आयोजित कार्यक्रमात दूरदृश्य प्रणालीद्वारे गडकरी यांनी संवाद साधला. ते म्हणाले की, मी इथेनॉलवर चालणारी टोयोटाची इनोव्हा मोटार वापरतो. पुढील सहा महिन्यात ह्युंदाई, महिंद्रा, टाटा सुझुकी या चार कंपन्या शंभर टक्के बायोइथेनॉलवर चालणाऱ्या मोटारी सादर करतील. याचबरोबर बजाज, टीव्हीएस, होंडा, हिरो या कंपन्या शंभर टक्के इथेनॉलवर चालणाऱ्या स्कूटर आगामी काळात बाजारात आणणार आहेत.

हेही वाचा >>> आमदारकीसाठी महायुतीत पुन्हा चढाओढ, नक्की काय आहे प्रकार ?

पूर्णपणे बायोइथेनॉलवर चालणारी वाहने आल्यानंतर त्याचा अर्थव्यवस्थेला मोठा फायदा होईल. पुण्यात प्रत्येक तालुक्यात साखर कारखाना असेल तर तिथे इथेनॉल निर्मिती होईल. तिथेच पेट्रोलला इथेनॉलचा पर्याय उपलब्ध होणार असून, त्यातून स्थानिक अर्थव्यवस्थेला बळ मिळेल. याचबरोबर डिझेलमध्ये १५ टक्के इथेनॉल मिश्रित करण्याचा प्रस्ताव ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडियाने (एआरएआय) पाठविला आहे. यामुळे आगामी काळात इथेनॉलचा वापर वाढून पेट्रोल आणि डिझेलचा वापर कमी होईल. यातून स्थानिक पातळीवर रोजगार निर्मितीतही वाढ होईल. याचबरोबर आपण खनिज तेलाची आयात कमी करून आत्मनिर्भर बनू, असेही गडकरी यांनी स्पष्ट केले.

दिल्लीत प्रदूषणाची समस्या आपण पाहात आहोत. देशातील एकूण प्रदूषणात वाहनांच्या प्रदूषणाचा वाटा ४० टक्के आहे. जैवइंधनामुळे हे प्रदूषण कमी होण्यास मदत होईल. याचबरोबर कृषी अर्थव्यवस्थेला चालनाही मिळेल. – नितीन गडकरी, केंद्रीय परिवहन व महामार्ग मंत्री