ज्यांनी काँग्रेसला भ्रष्टाचारी आणि जातीयवादी संबोधत प्रचार केला, त्याच आम आदमी पक्षाला (आप) काँग्रेसचा पाठिंबा घेऊन दिल्लीमध्ये सरकार करावे लागले. अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या पक्षाचा बोलबाला झाला. पण, आगामी लोकसभा निवडणूक ही केवळ दिल्ली शहराची नाही तर देशाची आहे हे ध्यानात घ्यावे, अशा शब्दांत भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस व्यंकय्या नायडू यांनी ‘आप’ला टोला लगावला. १२० कोटी लोकसंख्येचे समाधान करण्याची क्षमता केवळ नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामध्येच असल्याचा दावा त्यांनी केला. अल्पकालीन राजकीय लाभासाठी सत्ता संपादन केली असली, तरी ‘आप’ची विश्वासार्हता संपुष्टात आली आहे, असेही ते म्हणाले.
विविध कार्यक्रमांसाठी पुण्यात आलेल्या व्यंकय्या नायडू यांनी रविवारी पत्रकारांशी संवाद साधला. भाजपचे शहराध्यक्ष अनिल शिरोळे, आमदार गिरीश बापट, माधुरी मिसाळ आणि महिला आघाडीच्या शहराध्यक्षा मेधा कुलकर्णी या वेळी उपस्थित होत्या.
पंतप्रधानपदासाठी भाजपने नरेंद्र मोदी यांचे नाव घोषित केल्यामुळे काँग्रेस पक्ष हैराण झाला आहे. राजकीय दिवाळखोरीत निघालेल्या काँग्रेसकडे देशामध्ये लोकप्रिय असलेल्या मोदींच्या विरोधात सक्षम नेतृत्व नाही, असा दावा करून नायडू म्हणाले, काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी मोदींना ‘मौत का सौदागर’ असे संबोधिले. तर, अन्य नेतेदेखील मोदींवर टीका करीत आहेत. रुपयाचे झालेले अवमूल्यन, आंतरराष्ट्रीय क्षेत्रात घसरलेली पत ही काँग्रेसची कमाई असून आगामी लोकसभा निवडणुकीत जनतेने काँग्रेसला पराभूत करण्याचा निश्चय केला आहे. काँग्रेसला तीन आकडी संख्या गाठणे मुश्किल होणार असून देशाच्या इतिहासात नीचांकी जागा मिळतील.
काँग्रेस नेत्यांना मनातले बोलण्याची भीती
शरद पवार पंतप्रधान झाल्यास आनंद हाईल असे म्हणणाऱ्या केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी या विधानाचे खंडन केले ही बाब निदर्शनास आणून देताच व्यंकय्या नायडू म्हणाले, काँग्रेस नेत्यांच्या मनात आहे ते बोलण्याचीही त्यांना भीती वाटते. त्यामुळे आपल्याच विधानाचा इन्कार करावा लागतो याचे शिंदे हे द्योतक आहे. शरद पवार हे अनुभवी नेते असले, तरी ते पंतप्रधानपदाच्या शर्यतीमध्ये नाहीत. आपण लोकसभा लढणार नाही हे त्यांनी यापूर्वीच जाहीर केले आहे. ‘पीएम’ होण्याआधी मोदींनी ‘सीएम’ पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे याकडे लक्ष वेधताच पंतप्रधानपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतरच नरेंद्र मोदी गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देतील, असे नायडू यांनी स्पष्ट केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा