कंच हिरव्या वटवृक्षाखाली देखणे देवालय, समोर दीपमाळ, बाजूला तुळशी वृंदावन, घाटाच्या सुबक पायऱ्या अन् जलाशयातील फुललेली गुलाबी कमळे, रेषांमधून साकारलेला ज्येष्ठ चित्रकार रवी परांजपे यांचा हा कलाविष्कार पाहताना डोळ्यासमोर उभे राहिले जळगावजवळील एरंडोल येथील गणपतीचे स्थान. इथे आवळे जावळे (जुळे) गणपती आहेत अन् मंदिराच्या बाजूला आहे विस्तीर्ण जलाशय. वाऱ्याच्या मंद झुळुकेसरशी पाण्यावर उठणारे तरंग अन् हलकेच डुलणारी असंख्य गुलाबी, पांढरी कमळे अन् म्हणून या स्थानाचे नाव पद्मालय. किती सार्थ नाव!

शिल्प, काव्य, चित्र, अध्यात्म यावर आपली अमीट छाप उमटवणारे कमळ हे भारताचे राष्ट्रपुष्प आहे. सुमार सौंदर्याने ते आपले अन् म्हणूनच देवाचेही आवडते फूल आहे. याचे नाव नेब्यूला न्यूसीफेरा. मोठ्ठा जलाशय हे कमळाचे आवडते स्थान. याचे रताळ्यासारखे पांढुरके कंद चिखलात वाढतात अन् मोठे देठ पाण्याबाहेर वाढून नाजूक, पातळ मोठी पाने येतात. कमळाचे फूलही मोठे असते. यात लाल, गुलाबी, पांढरा रंग आढळतो. मध्ये पिवळे पुंकेसर असते. फुले पाण्याच्या बरीच वर येतात. पाकळ्या गळाल्यावर मधल्या पेल्यात गोल गोल कप्प्यात बिया येतात. बिया वाळल्यावर हा पेला सुंदर दिसतो. पुष्परचनेमध्ये वापरता येतो. कमळाचे प्रजनन कंदापासून व बियांपासून होते. कंदापासून ही प्रक्रिया सहजगत्या होते. बियांपासून रोप होण्यास वेळ लागतो. बियांची प्रजनन क्षमता शेकडो वर्ष राहू शकते. चीनमध्ये बाराशे वर्षांची जुनी जिवंत बी सापडल्याचे पुरावे आहेत.

prasad oak baburav paintar biopic
प्रसाद ओक करणार प्रसिद्ध निर्माते आणि दिग्दर्शक बाबुराव पेंटर यांची भूमिका; पोस्ट शेअर करत म्हणाला, “ही भूमिका साकारायला मिळणं हा श्री…”
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
mrunal thakur marathi film sangeet manapman review
सुबोध भावेच्या ‘संगीत मानापमान’ सिनेमासाठी अभिनेत्री मृणाल ठाकूरची पोस्ट, म्हणाली…
about writer filmmaker pritish nandy life journey
व्यक्तिवेध : प्रीतीश नंदी
Passenger bitten security force jawan, Vasai,
वसई : प्रवाशाने घेतला सुरक्षा बलाच्या जवानाचा चावा
tulja bhavani shakambhari navratrotsav loksatta news
शाकंभरी नवरात्र महोत्सव : सहाव्या माळेला महिषासूरमर्दिनी अलंकार महापूजा
jijau Jayant 2025
जिजाऊंच्या जयघोषाने मातृतीर्थ दुमदुमले, सिंदखेडराजात पाऊण लाख शिवभक्त
maharashtrachi hasya jatra fame prasad khandekar writes letter
“प्रिय रसिक-मायबाप, मराठी चित्रपटसृष्टीला…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रसाद खांडेकरची प्रेक्षकांना भावनिक साद, म्हणाला…

माझ्या स्नेही ललिता ओक यांनी मला कमळाच्या पाच बिया दिल्या. पहिल्या दोन बिया महिनाभर पाण्यात राहून अंकुरल्या नाहीत. तिसऱ्या बीसाठी कोमट पाणी घालून प्रयोग केला. तिन्हीचे पाणी रोज बदलत होतो. पण तीनही बिया रुजल्या नाहीत. चौथ्या व पाचव्या बी ला माझ्या मुलीने सूक्ष्म छिद्र केले आणि चौथ्या दिवशी छिद्रातून सशक्त कोंब बाहेर आला. तीन बिया जलाशयात सोडल्या. दोन रोपं गच्चीत बाळसं धरत आहेत.

‘सूय्रे फाकती कमळे’ ज्ञानदेव म्हणतात. कारण ती सूर्योदयानंतर उमलतात अन् दुपारी मिटतात. कमळास उष्मा आवडतो. पूर्वी बंगल्यामध्ये अंगणात पुष्करणी असत ज्यात कमळे फुलत. आता सोसायटय़ांमध्ये जलतरण तलाव असतात, तर कमळासाठी उथळ जलाशय करता येतील. नाही तर सिमेंटच्या मोठय़ा कुंडीत, प्लॅस्टिकच्या गोल टाकीत कमळ लावता येते. कुंडीत तळात माती घालून कमळकंद लावावा. वर हळूहळू पाणी वाढवावे. कुंडी उन्हाच्या जागी ठेवावी. कमळास शेणखत आवडते. खताची मात्रा कुंडीचा आकार व रोपाचे वय यावरून ठरवावी. आम्ही दोन महिन्यातून एकदा शेणखत घालतो. कंद रुजला की पाण्यावर तरंगणारी पाने येतात. नंतर उंच देठाची हवेतली पाने येतात. पानांचा आकार ताटाएवढा वाढतो आणि सशक्त दांडा फुटून त्यास कमळाचे देखणे फूल येते. त्याचा आनंद काय हा अनुभवायलाच हवा.

कमळासारखेच फूल असणारे निम्फिया कुटुंबाचे सदस्यही लोकप्रिय आहेत. कारण ते सहज रुजतात, खूप फुलतात. यात जांभळा, गुलाबी, पिवळा असे अनेक रंग उपलब्ध असतात. या वॉटर लिलीचे कंद छोटय़ा प्लॅस्टिक टबमध्ये ही माती व शेणखत एकत्र करून लावता येतात. पिवळा रंग दुर्मिळ व कमी फुलतो. ही फुले दिसतात सुंदर, अगदी कमळासारखीच पण हे ‘खरे कमळ’ नाही. याची पाने किंचित जाडसर, पाण्यावर तरंगणारी. फुलांचे दांडे जेमतेम चार-पाच इंच असतात. कमळ, वॉटर लिली यांची सडलेली पाने काढावीत. गोगलगायी होणार नाहीत याची दक्षता घ्यावी, सर्वात महत्त्वाचे कुंडीत गप्पी मासे सोडावेत. ते पाण्यात डास होऊ देणार नाहीत.

कमळे व निम्फियाची रोपं नर्सरीत उपलब्ध असतात. छोटय़ा-छोटय़ा जलाशयातील प्लॅस्टिक ड्रममधील, प्लॅस्टिक कागद लावून केलेल्या तळ्यांमधील असंख्य लाल, गुलाबी, पांढरी, कमळे फुललेली पाहून मन मोहून जाईल. अन् दोन-चार कमळ आणि वॉटर लिली तुमच्या बागेचे सदस्य होतील. कमळाचे वैशिष्टय़ म्हणजे याचे सर्व भाग खाण्यास योग्य असतात. पातळ, नाजूक पानांवर जेवू शकतो. देठांची, कंदाची भाजी आणि रायतं करतात. पाकळ्या पदार्थ सजावटीसाठी वापरतात. पण आपणास बाजारात सहज उपलब्ध पदार्थ म्हणजे कमळाच्या बियांच्या लाह्या ‘मकाणे’ अत्यंत पौष्टिक. कच्चे खाता येतात पण साजूक तूप, हिंग, जिरे, हळद, मीठ घालून परतले तर जाता-येता तोंडात टाकता येतात. अथवा मकाण्याच्या पीठाची खीरही करता येते.

असा हा कमळ प्रपंच कशासाठी, तर कमळाचे लोभस लावण्य बागेस लाभावे यासाठी. घराचे पद्मालय व्हावे यासाठी अन् गणरायाच्या पूजेत ‘आवडती तुज म्हणून आणिली रक्तवर्ण कमळे’ म्हणता यावे यासाठी!

प्रिया भिडे

(सदस्य, महाराष्ट्र वृक्ष संवर्धिनी)

Story img Loader