निगडी येथील लोकमान्य रुग्णालयात मणक्यांच्या विकारांवरील उपचारांसाठी विशेष केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्रात मणक्यांच्या आजारांचे निदान, दुर्बिणीच्या साहाय्याने लहान छेद घेऊन केल्या जाणाऱ्या तसेच इतर आधुनिक पद्धतींनी केल्या जाणाऱ्या शस्त्रक्रिया तसेच पूरक उपचारांची सुविधा उपलब्ध आहे. रुग्णालयाच्या अस्थिरोग विभागाचे प्रमुख डॉ. नरेंद्र वैद्य यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
डॉ. वैद्य म्हणाले, ‘‘प्रत्येक पाच जणांपैकी चार जणांना पाठीचे दुखणे असल्याचे दिसून येते. खाण्यापिण्याच्या अयोग्य सवई, बसण्याची चुकीची पद्धत, अपुरी झोप आणि व्यायामाचा अभाव यामुळे ही समस्या वाढते आहे. मणक्यांवरील उपचारांसाठी येणाऱ्यांपैकी ७५ टक्के लोक ४० वर्षांखालील असल्याचे दिसून येते. मानेचा आणि कमरेचा स्पाँडिलायटिस, सायटिका, चकती घसरणे, कमरेतील मणक्याच्या चकतीची झीज, हाडे ठिसूळ होणे या नेहमीच्या समस्या असल्याचे दिसून येते. प्रत्येक दुखण्यासाठी शस्त्रक्रियेची आवश्यकता नसून जीवनशैलीत बदल आणि बसण्याची योग्य पद्धत अवलंबल्यामुळेही दुखण्यात फरक पडू शकतो.’’