हवामानातील बदलांचा उत्पादनावर परिणाम

पुणे : हापूसच्या तुलनेत अधिक गोड आणि रसाळ असलेल्या रत्नागिरी जिल्ह्य़ातील अमृत पायरीची आवक एप्रिल महिना संपत आला तरी बाजारात अत्यल्पच होत असल्याचे चित्र आहे. यंदा एकंदरच हवामानात झालेल्या बदलांचा परिणाम आंबा उत्पादनावर झाला आहे. अमृत पायरीच्या पाच ते सात डझनाच्या पेटीला (कच्चे फळ) घाऊक बाजारात ३००० रुपये असा दर मिळाला आहे.

रत्नागिरी हापूस आणि अमृत पायरीच्या चवीत मोठा फरक आहे. अमृत पायरी जातीचा आंबा गोड आणि रसाळ असतो. हापूस प्रमाणे रत्नागिरी भागातील अमृत पायरीलाही मोठी मागणी असते. यंदा हवामानातील बदलांमुळे आंबा उत्पादनावर परिणाम झाला आहे. आंब्याच्या प्रतवारीवरही काहीसा परिणाम झाला आहे. फळ बाहेरून आकर्षक दिसत नसले तरी आतून गोड आहे.

रत्नागिरी जिल्ह्य़ातील पावस, पूर्णागड, गावखडी, अडिवरे, कशेळी, राजापूर भागातून अमृत पायरीची बाजारात आवक सुरू आहे.  अमृत पायरीची साल पातळ असते. आमरसासाठी अमृत पायरीला मागणी असते. अमृत पायरीला घरगुती ग्राहक तसेच हॉटेल व्यावसायिकांकडूनही चांगली मागणी असते, अशी माहिती मार्केटयार्डातील आंब्यांचे व्यापारी करण जाधव यांनी दिली.

अमृत पायरीची लागवड हापूसच्या तुलनेत कमी होते. रत्नागिरी जिल्ह्य़ातील आंबा उत्पादक शेतकरी अमृत पायरीची लागवड करतात. एखाद्या शेतक ऱ्याच्या बागेत १०० झाडे हापूसची असतील तर त्यातील पाच ते दहा झाडे अमृत पायरीची असतात. त्यामुळे अमृत पायरीची आवक हापूसच्या तुलनेने कमी असते. मात्र, यंदा गेल्यावर्षीचा विचार करता आंबा उत्पादन कमी झाले आहे. यंदा आंब्यांचा हंगाम सुरू झाल्यानंतर आतापर्यंत बाजारात फक्त १५०० ते २००० पेटय़ा एवढी अमृत पायरीची आवक झाली आहे. गेल्यावर्षी अमृत पायरीची आवक जास्त झाली होती.

दरात अल्पशी घट

सध्या बाजारात रत्नागिरी हापूसच्या पाच ते सात हजार पेटय़ांची आवक दररोज होत आहे. गेल्या आठवडय़ाच्या तुलनेत रत्नागिरी हापूसच्या पेटीचे दर उतरले आहेत. कर्नाटक हापूसची आवक वाढली असून त्यामुळे रत्नागिरी हापूसचे दर कमी झाले आहेत. गेल्या दहा ते बारा दिवसांपासून रत्नागिरी हापूसची आवक स्थिर आहे. आवक वाढण्याची शक्यता नसल्याचे आंबा व्यापारी नाथसाहेब खैरे यांनी सांगितले.