पुणे : राज्यात पेरू फळपिकाखालील लागवड क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. पेरूचे अतिरिक्त उत्पादन होत आहे. त्या तुलनेत मागणीत वाढ झालेली नाही. परिणामी, शेतकऱ्यांना जेमतेम दहा रुपये किलो इतका भाव मिळत आहे. झाडावरील तयार पेरू तोडण्याचा खर्चही निघत नाही. पेरूच्या बागांमध्ये, बांधांवर पिवळा चिखल साचत आहे. अनेक शेतकरी पेरूच्या बागा काढून टाकत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राज्यात गेल्या पाच वर्षांत पेरूच्या क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. कृषी विभागाच्या २०२३ – २४ च्या आकडेवारीनुसार राज्यात १९,३८५ हेक्टरवर पेरूची लागवड आहे. त्यात पुणे (३५७८ हेक्टर), नाशिक (१५७१ हेक्टर), सोलापूर (३६४३ हेक्टर) आणि नगर (३२४४ हेक्टर) हे जिल्हे आघाडीवर आहेत. राहता (जि. नगर) येथील पेरूउत्पादक संदीप टिळेकर म्हणाले, की राहता परिसरात यंदा आंबेबहरात पेरूचे उत्पादन घेता आले नाही. उन्हाळ्यात पेरूच्या बागांना पाणी मिळाले नाही. पाऊस लवकर सुरू झाला. त्यामुळे फळे धरता आली नाहीत. त्यामुळे सर्वच बागायतदार मृग हंगामात फळे घेत आहेत. त्यामुळे बाजारात एकाच वेळी पेरू येणार आहेत. सध्या अगाप काढणीलाही प्रतिकिलो ६ ते १० रुपयांचा दर मिळत आहे. उत्पादन खर्चानुसार प्रतिकिलो २० ते २५ किलो दर मिळणे गरजेचे आहे. पाच-दहा रुपये दराने पेरूची तोडणी आणि वाहतूक खर्चही निघत नाही. यंदा आंबेबहर वाया गेल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. राहता परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी पेरूच्या बागा काढून टाकल्या आहेत.

हेही वाचा – राज्यात तीन दिवस पावसाची विश्रांती? हवामान विभागाचा अंदाज

मागील हंगामातही अशीच स्थिती होती. ऐन हंगामात प्रतिकिलो पाच-सहा रुपयांचा दर मिळाला. त्यामुळे पेरू झाडावरच पिकून गळून पडले. बांधांवर पिकलेल्या पेरूंचा खच पडला होता. पेरूच्या बागेत दुर्गंधी सुटली होती. राज्यात अतिरिक्त उत्पादन होत आहे. पेरूवर प्रक्रिया उद्योगाचा वेगाने विकास होण्याची गरज आहे. लागवडीनंतर पंधरा महिन्यांत पेरूचे उत्पादन सुरू होते. तर एकदा लागवड केल्यानंतर योग्य काळजी घेतल्यास पेरूची झाडे ४० – ५० वर्षे फळे देतात. त्यामुळे लागवड वाढली; पण दराअभावी शेतकऱ्यांची निराशा होत आहे. मागील वर्षी राहता परिसरात पात्र ठरूनही पेरूला फळ पीकविमा मिळाला नाही, असेही टिळेकर म्हणाले.

हेही वाचा – पिंपरी : दुथडी वाहणारी इंद्रायणी, तीन तास बचाव कार्याचा थरार, तीन गायींना जीवनदान!

राज्यात पेरू लागवडीखालील क्षेत्र ३५,००० हेक्टरवर गेले होते. पण, कमी उत्पादन आणि कमी भावामुळे शेतकऱ्यांनी पेरूच्या बागा काढून टाकल्या. पेरूला सरासरी जेमतेम १० रुपये किलो भाव मिळत आहे. वर्षात तीन वेळा पेरूचे उत्पादन घेता येते. पण, मृगबहरात सर्वाधिक फळधारणा होते. प्रक्रिया उद्योगातून फक्त पाच ते सात रुपये किलो दर मिळतो. त्यामुळे राज्यभरातील पेरूउत्पादक अडचणीत आहेत. – विनायक दंडवते, अध्यक्ष, भारतीय पेरूउत्पादक संघ

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Very low price to guava time on farmers to remove orchards pune print news dbj 20 ssb