तळजाईप्रमाणेच वेताळ टेकडीवर फिरण्यासाठीही जानेवारीपासून वेळा पाळाव्या लागणार आहेत. अवेळी टेकडीवर जाणाऱ्यांना तसेच टेकडीवर जाऊन मद्यप्राशन करणाऱ्यांना चाप लावण्यासाठी वनविभागाने हा निर्णय घेतला आहे. वन जमिनीचे नुकसान टाळण्यासाठी नागरिकांनी एकाच प्रमुख रस्त्याने फिरावे, असे आवाहन देखील वनविभागाने केले आहे.
पुणे विभागाचे उपवनसंरक्षक सत्यजित गुजर यांनी ही माहिती दिली. सध्या वेताळ टेकडीवर जाण्या-येण्याच्या वेळा ठरलेल्या नाहीत. त्यामुळे नागरिक कोणत्याही वेळेस टेकडीवर फिरायला जाऊ शकतात. अनिश्चित वावरामुळे वनक्षेत्रावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे, असे गुजर यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘‘टेकडीवर फिरायला येणाऱ्या नागरिकांबरोबर वन विभागाची बैठक झाली असून त्यात नागरिकांनी काही सूचना केल्या. वेताळ टेकडी आणि तळजाईवर ‘नेचर ट्रेल’ करण्याचा वनविभागाचा विचार आहे. पण त्या नावाखाली टेकडीवर बांधकाम केले जाईल असा काही नागरिकांचा समज होता. टेकडय़ांवर कोणतेही बांधकाम केले जाणार नसल्याचे आम्ही बैठकीत स्पष्ट केले. टेकडीवर केवळ नागरिकांना सूचना देणारे फलक आणि स्वच्छता राहण्यासाठी कचरा पेटय़ा ठेवण्यात येणार आहेत. तसेच वेताळ टेकडीला प्रवेशद्वार करण्यात येणार आहे. सध्या याबाबत आम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेत असून या महिनाअखेरीस कामाचा आराखडा निश्चित होईल. जानेवारीपासून वेताळ टेकडीवर फिरण्यासाठी वेळा निश्चित केल्या जातील.’’ सकाळी ६ ते ९ आणि सायंकाळीही ६ ते ९ हा कालावधी टेकडीवर फिरण्यासाठी ठरवला जाण्याची शक्यता आहे.
वेताळ टेकडी आणि तळजाईवर बरेच लहान- लहान रस्ते आहेत. सध्या हे सर्व रस्ते नागरिकांकडून वापरले जातात. असे न करता नागरिकांनी एकाच रस्त्याने जावे व एकाच रस्त्याने परत यावे, असे वनविभागाचे म्हणणे आहे. याबाबत गुजर म्हणाले, ‘‘संपूर्ण टेकडीवर मानवी वावर असेल तर त्यामुळे तिथली माती ढासळून मातीची धूप होते. याचा परिणाम त्यावर उगवणाऱ्या वनस्पतींवर होऊन वनस्पती उगवण्याचे प्रमाण कमी होते. हे टाळण्यासाठी एकच रस्ता खुला ठेवण्याचे ठरवण्यात आले. वेताळ टेकडीवर प्रवेशद्वार करण्याबरोबरच प्रमुख रस्त्याव्यतिरिक्त इतर रस्ते बंद करण्यासाठी चर खोदले जाणार आहेत.  
दोन्ही टेकडय़ांवरच्या प्रस्तावित ‘नेचर ट्रेल’मध्ये टेकडीवरील रस्त्यांवर निसर्गाविषयी माहिती देणारे फलक लावण्याचा समावेश आहे. या सर्व गोष्टींसाठी नावीन्यपूर्ण योजनेअंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला असून त्या निधीतून ही कामे केली जातील, असेही गुजर यांनी सांगितले.

Story img Loader