ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांना पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दीर्घकालीन आजारावर उपचारांसाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती रुग्णालयातील सुत्रांकडून देण्यात आली आहे. दरम्यान, पालेकर यांच्या कुटूंबियांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता कोणताही संपर्क होऊ शकलेला नाही.
अमोल पालेकर यांची प्रकृती सुधारत आहे. आधीपेक्षा त्यांची तब्येत चांगली आहे. काळजी करण्याचं कोणतंही कारण नाही, अशी माहिती अमोल पालेकर यांच्या पत्नी संध्या गोखले यांनी एबीपी लाईव्हला दिलेल्या प्रतिक्रियेत दिली. त्या म्हणाल्या, “हा जुना आजार आहे. अमोल पालेकर यांना १० वर्षापूर्वी देखील धुम्रपानामुळे रुग्णालयात दाखल करावं लागलं होतं. मात्र, सध्या त्यांची तब्येत व्यवस्थित आहे.”
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील डॉ. परिक्षित प्रयाग म्हणाले, “अमोल पालेकर सुरुवातीला खूप अशक्त स्थितीत दाखल झाले होते. तेव्हा त्यांना व्हेंटिलेटरची गरज पडली होती. नंतर त्यांना आयसीयूत हलवण्यात आलं.”
हेही वाचा : अमोल पालेकर यांची ‘छोटी सी बात’!
अमोल पालेकर यांनी तब्बल ५ दशके भारतीय चित्रपटसृष्टीत काम करून आपला वेगळा ठसा उमटवला आहे. त्यांनी हिंदी आणि मराठीशिवाय इतरही अनेक प्रादेशिक भाषांमधील चित्रपटांमध्ये काम केलंय. रजनीगंधा, छोटी सी बात, गोलमाल, चितचोर, नरम गरम, बातो बातो में या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनावर कोरलेल्या आहेत. अमोल पालेकर यांनी दररोजच्या आयुष्यातील अडचणींमध्येही पुढे जाणाऱ्या मध्यमवर्गीय व्यक्तीची वास्तववादी भूमिका साकारण्याचं श्रेयही पालेकर यांना दिलं जातं.