पुणे : रंगभूमी, चित्रपट आणि दूरचित्रवाणी मालिका अशा सर्व माध्यमांतून आपल्या अभिनय कर्तृत्वाचा ठसा उमटवून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे ज्येष्ठ अभिनेते-दिग्दर्शक विक्रम चंद्रकांत गोखले (७७) यांचे शनिवारी प्रदीर्घ आजाराने खासगी रुग्णालयात निधन झाले. सीमेवर लढणाऱ्या जवानांना अर्थसाह्य करण्याबरोबरच रोखठोक भूमिका घेणारे पारदर्शी व्यक्तिमत्त्व असा सामाजिक भान जपणारा कलाकार काळाच्या पडद्याआड गेला आहे. त्यांच्यामागे पत्नी वृषाली आणि दोन कन्या असा परिवार आहे.
गेल्या काही वर्षांपासून गोखले यांना मधुमेहाचा विकार होता. त्यातच श्वसन घेण्यास त्रास होऊ लागल्याने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, गुंतागुंत वाढल्याने त्यांची प्रकृती उपचारांना पुरेसा प्रतिसाद देत नव्हती. शुक्रवारी त्यांची प्रकृती सुधारत असल्याचे आशादायक चित्र असले, तरी शनिवारी प्रकृती पुन्हा खालावली आणि दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली. गोखले यांचे पार्थिव दुपारी बालगंधर्व रंगमंदिर येथे ठेवण्यात आले होते. पालकमंत्री चंद्रकांत पाटील, सतीश आळेकर, सुबोध भावे, राहुल सोलापूरकर यांच्यासह अनेकांनी गोखले यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. सायंकाळी वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
विक्रम गोखले हे गोखले घराण्याच्या अभिनय परंपरेतील चौथ्या पिढीचे प्रतिनिधी होते. त्यांच्या पणजी दुर्गाबाई कामत या भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिल्या स्त्री अभिनेत्या, तर आजी कमलाबाई गोखले (पूर्वाश्रमीच्या कमलाबाई कामत) या पहिल्या बाल-अभिनेत्री होत्या. भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांची निर्मिती आणि दिग्दर्शन असलेल्या १९१३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मोहिनी भस्मासुर’ चित्रपटात दुर्गाबाई यांनी पार्वतीची आणि कमलाबाईंनी मोहिनीची भूमिका केली होती. ज्येष्ठ अभिनेते चंद्रकांत गोखले यांचा अभिनयाचा वारसा पुढे नेताना विक्रम गोखले यांनी सीमेवरील जवानांसाठी अर्थसाह्य करण्याची परंपरा जीवनाच्या अखेपर्यंत सुरू ठेवली.
गोखले यांचा जन्म ३० ऑक्टोबर १९४५ रोजी पुण्यामध्ये झाला. त्यांचे शालेय शिक्षण वि. रा. वेलणकर शाळेत, तर महाविद्यालयीन शिक्षण गरवारे महाविद्यालयात झाले. बाळ कोल्हटकर यांच्या ‘वाहतो ही दुर्वाची जुडी’ या नाटकातील भूमिकेने त्यांचे रंगभूमीवर पदार्पण झाले. विजया मेहता यांच्या ‘बॅरिस्टर’ या नाटकाने त्यांना स्वतंत्र ओळख दिली. त्यांचीच, ‘कमला’ आणि ‘महासागर’ ही नाटके विशेष गाजली. ‘श्वेतांबरा’ या दूरदर्शनवरील पहिल्या मालिकेमधील त्यांची भूमिका रसिकांच्या अजूनही स्मरणात आहे. गोदावरी हा त्यांची अखेरची भूमिका असलेला चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे.