चाकोरीबाहेरील चित्रपटांद्वारे चित्रपटसृष्टीवर आपला अनोखा ठसा उमटविणाऱ्या दिग्दर्शिक आणि समाज अभ्यासक सुमित्रा भावे यांचे सोमवारी सकाळी निधन झाले. त्या ७८ वर्षांच्या होत्या. त्यांच्या ‘कासव’ या चित्रपटाला २०१६ मध्ये राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गेल्या काही दिवसांपासून भावे आजारी होत्या. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. भावे यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. सुनील सुकथनकर, डॉ. शेखर कुलकर्णी, गिरीश कुलकर्णी, उमेश कुलकर्णी, वरुण नार्वेकर, देविका दफ्तरदार, रेणुका दफ्तरदार, यशोदा वाकणकर, आलोक राजवाडे, पर्ण पेठे, मिलिंद जोग, साकेत कानेटकर आदी या वेळी उपस्थित होते.

सुमित्रा भावे यांनी दिग्दर्शक सुनील सुकथनकर यांच्या सोबतीने अनेक उत्तमोत्तम मराठी चित्रपटांची निर्मिती केली. ‘बाई’ आणि ‘पाणी’ या सुरुवातीच्या लघुपटांना लोकप्रियता मिळाल्यानंतर त्यांनी १९९५ मध्ये ‘दोघी’ हा पहिला पूर्ण लांबीचा चित्रपट तयार केला. त्यानंतर त्यांनी दिग्दर्शित केलेले ‘दहावी फ’, ‘वास्तुपुरुष’, ‘देवराई’, ‘बाधा’, ‘नितळ’, ‘एक कप च्या’, ‘घो मला असला हवा’, ‘कासव’, ‘अस्तू’ हे चित्रपट गाजले. त्यांचे चित्रपट आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांत नावाजले गेले, तर अनेक चित्रपटांना राज्य आणि राष्ट्रीय पुरस्कारही मिळाले. ‘दिठी’ हा त्यांनी स्वतंत्ररीत्या दिग्दर्शित केलेला चित्रपट दोन वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता. सोनाली कु लकर्णी, उमेश कुलकर्णी, सचिन कुंडलकर यांच्यासह अनेक कलाकारांना सुमित्रा भावे यांच्याकडे चित्रपटाचे धडे गिरवता आले.

समाजशास्त्रज्ञ ते चित्रपटनिर्मिती

सुमित्रा भावे यांचा जन्म १२ जानेवारी १९४३ रोजी पुण्यात झाला. फर्ग्युसन महाविद्यालयातून पदवी मिळविल्यानंतर मुंबईतील टाटा समाजविज्ञान संस्थेतून त्यांनी ‘ग्रामीण विकास’ या विषयात पदविका मिळविली. शिक्षण पूर्ण झाल्यावर भावे यांनी अनेक समाजसेवी संस्थांमध्ये विनामोबदला काम केले. पूर्ण वेळ समाजशास्त्रज्ञ म्हणून काम करायचे ठरविल्यानंतर त्या अपघातानेच लघुपटाकडे वळल्या. मात्र, या माध्यमाची ताकद लक्षात आल्यानंतर त्यांनी पूर्ण वेळ चित्रपट निर्मितीत उतरण्याचा निर्णय घेतला. वयाच्या पंचाहत्तरीनंतरही त्या कार्यरत होत्या.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Veteran director sumitra bhave passes away abn