ज्येष्ठ साहित्यिक व कवी नामदेव धोंडो महानोर यांचं आज सकाळी निधन झालं. पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयात त्यांच्यावर उपचार चालू होते. त्यांच्या निधनामुळे मराठी साहित्य विश्वातून शोक व्यक्त केला जात आहे. ते ८१ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून ते व्हेंटिलेटरवर होते. आपल्या तरल काव्याच्या जोरावर काव्यप्रेमी मराठी वाचकांच्या मनात ना. धों. महानोर यांनी हक्काचं स्थान प्राप्त केलं होतं. महानोर यांनी काव्यसंग्रहांबरोबरच अनेक चित्रपटांसाठीही गीते लिहिली. त्यांच्या या गीतांना त्यांच्या कवितांप्रमाणेच मराठी प्रेक्षकांची पसंती मिळाली. शुक्रवारी पळसखेड या त्यांच्या गावी त्यांच्यावर अंत्यसस्कार करण्यात येणार आहेत.
प्रसिद्ध कवितासंग्रह!
ना. धों. महानोर यांचे अनेक कवितासंग्रह वाचकांच्या विशेष पसंतीस उतरले. त्यात अजिंठा या दीर्घ काव्यसंग्रहाचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. त्याचबरोबर गंगा वाहू दे निर्मळ, जगाला प्रेम अर्पावे, दिवेलागणीची वेळ, पावसाळी कविता, रानातल्या कविता असे त्यांचे कवितासंग्र लोकप्रिय ठरले. यासह गपसप, गावातल्या गोष्टी हे कथासंग्रहदेखील वाचकांच्या पसंतीस उतरले. १६ सप्टेंबर १९४२ मध्ये जन्मलेल्या ना.धो. महानोर यांनी आपल्या साहित्यात काहीवेळा बोलीभाषांचा वापर केला आहे. महानोर यांच्या कवितांनी बालकवी व बहिणाबाईंचा वारसा समृद्ध केला.
चित्रपटांसाठी गीतलेखन
ना. धों. महानोर यांच्या कवितांनी मराठी काव्यप्रेमींच्या मनावर अक्षरश: गारूड केलं. पण याचबरोबर त्यांनी मराठी चित्रपटांसाठीही गाणी लिहिली. १९९५ साली त्यांनी अबोली या मराठी चित्रपटासाठी लिहिलेली गाणी विशेष लोकप्रिय ठरली. त्याचबरोबर एक होता विदूषक (१९९), जैत रे जैत (१९७७), दोघी (१९९५), मुक्ता (१९९४), सर्जा (१९८७), उरूस (२००८), मालक (२०१५), अजिंठा (२०११) आणि यशवंतराव चव्हाण (२०१२) अशा काही चित्रपटांमधील गाण्यांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल.
असा झाला ‘रानातल्या कवितां’चा जन्म!
जगलो, तेच लिहीत गेलो… ना. धों. महानोर यांच्यावरील विशेष लेख!
तीन वर्षांपूर्वी ना. धों. महानोर यांनी साहित्य संमेलनात केलेलं खणखणीत भाषण!
ना. धों. महानोर यांची राजकीय कारकिर्द
साहित्य क्षेत्राबरोबरच ना. धों. महानोर यांनी राजकीय क्षेत्रातही काम केलं होतं. १९७८ साली ना. धों. महानोर हे महाराष्ट्र विधानपरिषदेचे सदस्य म्हणून नियुक्त झाले होते. मात्र, निवडणुकीच्या राजकारणात ते कधी पडले नाहीत.